Shraddha Walkar murder Case : श्रद्धाच्या कुटुंबियांनी केली होती बेपत्ता असल्याची तक्रार, आफताबला दोनवेळा बोलावले होते चौकशीसाठी | पुढारी

Shraddha Walkar murder Case : श्रद्धाच्या कुटुंबियांनी केली होती बेपत्ता असल्याची तक्रार, आफताबला दोनवेळा बोलावले होते चौकशीसाठी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरूणीचा आफताब पूनावालाने निर्घृण खून करीत तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. श्रद्धाच्या कुटुंबियांनी मुंबईच्या उत्तरेस असलेल्या माणिकपूर पोलिस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता असल्याची नोंदवली होती. त्यानंतर नराधम आफताब पूनावाला याला ३ नोव्हेंबरसह दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने तो आणि श्रद्धा आता एकत्र राहत नाहीत असे सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आफताबचे कुटुंबीय फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रक्ताचे नमुने, हाडांची ‘डीएनए’ चाचणी होणार

आफताबने जंगलात फेकून दिलेले तिच्या शरिराचे तुकडे पोलिस आणि फॉरेन्सिक टीमला (एफएसएल) मिळाले आहेत. एफएसएल प्रयोगशाळेत हे नमुने पोहोचल्यानंतर श्रद्धाच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळतात का हे पाहिले जाणार आहे. यासाठी श्रद्धाचे वडील आणि भावाचे नमुने घेऊन डीएनए मॅच करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत एफएसएल टीमला १० ते १२ हाडे मिळाली असून पोलिसांना ९ हाडे मिळाली आहेत. तसेच दिल्ली पोलिसांना आफताबच्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग सापडले आहेत. त्यासाठी श्रद्धाच्या वडिलांना डीएनए चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे.

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने हॉलिवूड टीव्ही सीरीज डेक्सटर पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात जाऊन पॉलिथिन आणि फ्रीज खरेदी केला. जेव्हा त्याने श्रद्धाची हत्या केली त्यावेळी श्रद्धाला स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. त्याने आधी श्रद्धाचे तोंड दाबले, नंतर तिला जमिनीवर आपटून छातीवर बसवून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला. त्याने दुसऱ्या दिवशी धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले आणि एक एक करत ते त्याने जंगलात फेकून दिले. त्याने एक ते दीड महिन्याच्या कालावधीत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. आफताब सुमारे ४ वर्षांपासून श्रद्धाच्या संपर्कात होता आणि सुमारे दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशीनशीपमध्ये होता. त्याने एका झटक्यात तिची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा :

Back to top button