Shraddha Walkar murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण! रक्ताचे नमुने, हाडांची 'डीएनए' चाचणी होणार | पुढारी

Shraddha Walkar murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण! रक्ताचे नमुने, हाडांची 'डीएनए' चाचणी होणार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; वसईच्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा क्रूर खून (Shraddha Walkar murder Case) करून तिच्या शरिराचे ३५ तुकडे करणार्‍या नराधम आफताब पूनावालाने विकृतीचे टोक गाठले होते, असे त्याच्या कबुली जबाबातून समोर आले आहे. आफताबने जंगलात फेकून दिलेले तिच्या शरिराचे तुकडे पोलिस आणि फॉरेन्सिक टीमला (एफएसएल) मिळाले आहेत. एफएसएल प्रयोगशाळेत हे नमुने पोहोचल्यानंतर श्रद्धाच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळतात का हे पाहिले जाणार आहे. यासाठी श्रद्धाचे वडील आणि भावाचे नमुने घेऊन डीएनए मॅच करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत एफएसएल टीमला १० ते १२ हाडे मिळाली असून पोलिसांना ९ हाडे मिळाली आहेत. तसेच दिल्ली पोलिसांना आफताबच्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग सापडले आहेत. त्यासाठी श्रद्धाच्या वडिलांना डीएनए चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे.

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने हॉलिवूड टीव्ही सीरीज डेक्सटर पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात जाऊन पॉलिथिन आणि फ्रीज खरेदी केला. जेव्हा त्याने श्रद्धाची हत्या केली त्यावेळी श्रद्धाला स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. त्याने आधी श्रद्धाचे तोंड दाबले, नंतर तिला जमिनीवर आपटून छातीवर बसवून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला. त्याने दुसऱ्या दिवशी धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले आणि एक एक करत ते त्याने जंगलात फेकून दिले. त्याने एक ते दीड महिन्याच्या कालावधीत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. आफताब सुमारे ४ वर्षांपासून श्रद्धाच्या संपर्कात होता आणि सुमारे दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशीनशीपमध्ये होता. त्याने एका झटक्यात तिची निर्घृण हत्या केली.

विकृतीचा कळस…

एफएसएल टीमला त्याच्या फ्रीजमध्ये काहीही सापडले नाही. फ्रीज पूर्णपणे धुतला होता. टीमला आफताब रहात असलेल्या फ्लॅटच्या किचनमधून रक्ताचे काही नमुने मिळाले आहेत, पण याचीही पुष्टी त्यानंतरच होईल. जेव्हा त्याचा डीएनए सापडलेल्या हाडांशी आणि श्रद्धाचे वडील अथवा भावाशी मॅच होईल. पोलिसांना संपूर्ण घर स्वच्छ आढळून आले आहे. आफताबने पोलिसांकडे कबुली दिली आहे की, नंतर कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्याने फ्रीज आणि घरातील फरशी एका वेगळ्या केमिकलने स्वच्छ केली होती. किचनमध्ये रक्ताचे काही डाग आढळून आल्याने असे स्पष्ट होते की मृतदेह बाथरूममध्ये नेऊन कापल्यानंतर आफताबने किचनमध्येही काही तुकडे ठेवले होते. यानंतर त्याने मृतदेहाचे कापलेले तुकडे फ्रीजमध्ये पॅक करून ठेवले. तसेच तो काही खाद्यपदार्थही त्याच फ्रीजमध्ये ठेवत होता.

रोज एक-दोन तुकडे रात्री उशिरा जंगलात फेकून यायचा….

फ्रिजमध्ये ठेवलेले श्रद्धाच्या शरीराचे रोज एक-दोन तुकडे तो रात्री उशिरा जंगलात फेकून यायचा. आल्यावर फ्रिज उघडून तो श्रद्धाचा चेहरा बघत असे. विकृतीचा कळस गाठणार्‍या आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर आणखी एका तरुणीला घरी बोलावून मौज केल्याचेही आता समोर आले आहे.

श्रद्धा वालकर या तरुणीचा आफताब पूनावालाने निर्घृण खून करीत तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणातील आणखी तपशील आता समोर येत असून, आफताबने पापाची कबुली देताना आणखी नवीन माहिती दिली आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तो रोज एका काळ्या पिशवीतून एक-दोन तुकडे नेऊन जंगलात फेकायचा. त्याने श्रद्धाचे शिर फ्रिजमध्येच ठेवले होते. परतल्यावर फ्रिज उघडून तो श्रद्धाच्या चेहर्‍याकडे टक लावून बघत असे.

श्रद्धाच्या दोन मित्रांकडून खुलासा…

लक्ष्मण नाडर आणि रजत शुक्ला या श्रद्धाच्या दोन मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब मारहाण करत असल्याचे व त्रास देत असल्याचे श्रद्धाने त्यांना सांगितले होते. आम्ही तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्लाही दिला होता; पण तिने त्याला नकार दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, एका संभाषणात आपण तिला आफताबपासून वेगळी हो आणि निघून जा, असेही सांगितले होते; पण तिने ते शक्य नसल्याचे सांगितले होते. (Shraddha Walkar murder Case)

हे ही वाचा :

Back to top button