बारामती : चुकीची वक्तव्ये करून वातावरण गढूळ करू नका : अजित पवार यांचे सर्वपक्षीयांना आवाहन | पुढारी

बारामती : चुकीची वक्तव्ये करून वातावरण गढूळ करू नका : अजित पवार यांचे सर्वपक्षीयांना आवाहन

बारामती; पुढारी वृत्तसेवा : जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्ये करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रातील वडीलधार्‍या नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करणे शिकवले नाही. कोणत्याही पक्षाचे नेते, प्रवक्ते पक्षप्रमुखांकडून अशा प्रकारची वक्तव्ये होऊ नयेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत रविवारी (दि. 13) ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्यातील जनतेला सगळे समजते आहे.

कोण काय करतोय, कोण चुकीची वक्तव्ये करतो, याकडे जनतेचे लक्ष आहे. परंतु काही पक्षाचे लोक जाणीवपूर्वक चुकीचे बोलत आहेत. कोणत्याच पक्षाकडून सुंसस्कृत महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही. राहुल गांधी यांच्या मभारत जोडोफ यात्रेमध्ये सहभागी होण्यासंबंधी मी मंगळवारी (दि. 15) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या यात्रेत सहभागी होणार होते.

परंतु तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जाता आले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्ते, शिवसेनेकडून आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडोसंबंधी मी माझी भूमिका मंगळवारी स्पष्ट करेल.

शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळतो, मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अद्याप जामीन मिळत नाही, याबाबत माध्यमांनी अजित पवार यांना छेडले असता, पवार म्हणाले, ही न्यायालयीन बाब आहे, त्याबद्दल बोलणे योग्य होणार नाही. हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांपैकी एकानेही मला नाराज असल्याचे सांगितलेले नाही, असे अजित पवार म्हणाले.

Back to top button