राहुल गांधींच्या रुपाने आज माझा राजू घरी येत आहे; मुलाच्या आठवणीने रजनी सातवांचा दाटला कंठ | पुढारी

राहुल गांधींच्या रुपाने आज माझा राजू घरी येत आहे; मुलाच्या आठवणीने रजनी सातवांचा दाटला कंठ

कळमनुरी; शेख उमर फारूख : भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हिंगोली जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या रूपाने माझा राजू घरी परत येत आहे, अशी भावना व्यक्त करत दिवंगत काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या आई व माजी मंत्री रजनी सातव यांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.

भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली असून शनिवारी रात्री राहुल गांधी कळमनुरी येथे मुक्कामी थांबणार आहेत. यावेळी ते रजनी सातव यांचीही भेट घेणार आहेत. माजी मंत्री रजनी सातव म्हणाल्या की, ‘आज राजीव सातव असते तर राहुल गांधी यांचे आणखी भव्य स्वरूपात स्वागत केले असते. अबाल वृद्धांचा उत्साह पाहण्याजोगा राहिला असता. मात्र, दुर्दैवाने माझ्या राजूला नियतीने हिसकावून नेले. त्यांच्या आठवणी मी विसरू शकत नाही. राजीव सातव यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले. हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी कायम प्रयत्न केले. मोठे प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आणले. विकासासाठी निधी कसा उभारायचा, याची जाण त्यांना होती. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी झपाटून काम केले. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली. राजीव यांच्या जाण्याने केवळ सातव कुटुंबीयांचेच नव्हे तर पक्ष व जनतेचेही नुकसान झाल्याचे सांगताना रजनी यांचा कंठ दाटून आला.

रजनी सातव पुढे म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी शनिवारी सायंकाळी कळमनुरी येथे येणार आहेत. त्यांच्या रूपाने माझा राजू घरी येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. माजी खासदार राजीव सातव यांचा जिल्हा म्हणून राहुल गांधी हिंगोली जिल्ह्याचे विकासाकडे नक्की लक्ष देतील, असा विश्वास माजी मंत्री सातव यांनी व्यक्त केला. राहुल गांधी घरी आल्यानंतर आमच्या जिल्ह्याच्या विकासाकडे तसेच आमच्या कुटुंबाकडे लक्ष राहू द्या, अशी विनंती त्यांना करणार आहे, असेही रजनी सातव यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button