नगर शहरात धूमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

नगर शहरात धूमस्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर शहरात ठिकठिकाणी लुटारूंचा हैदोस सुरू असून दुचाकीस्वार लुटारूंमुळे दहशत निर्माण झाली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सततच्या लुटमारीच्या घटनांमुळे नगर पोलिसांच्या गस्तप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुचाकीवरून येऊन महिलांना टार्गेट करत त्यांचे दागिने, पैसे पैशांवर बळजबरीने डल्लामारी करणार्‍यांचे चांगलेच फावले आहे. सहकार सभागृह रोडवरील महात्मा फुले चौकाजवळ दुचाकीस्वार महिलेचे गंठण लांबविल्याची घटना बुधवारी घडली.

ही घटना ताजी असतानाच गुरूवारी (दि.10) सायंकाळी गुलमोहर रोडवर एका दुचाकीस्वार महिलेचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ओरबडून नेले आहे. याप्रकरणी दीपाली सोहम आंधळे (वय 23, रा. शिवनगर, निर्मलनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपाली या दुचाकीवरून नणंद सानिका संजय आंधळे यांच्यासोबत पारिजात चौकाकडून गुलमोहर रोडने प्रोफेसर चौकाकडे येत असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबडून नेले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button