अकरा ग्रामपंचायतींचा उडणार धुरळा ; येत्या 18 डिसेंबरला होणार मतदान | पुढारी

अकरा ग्रामपंचायतींचा उडणार धुरळा ; येत्या 18 डिसेंबरला होणार मतदान

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, त्यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. एकशे नऊ सदस्य आणि अकरा सरपंचाचे भवितव्य या दिवशी मतदान यंत्रांत बंद होणार आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने, अनेक इच्छुकांनी उमेदवारी करण्यासाठी गाव पातळीवर फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील मोहरी, वडगाव, सोनोशी, कोळसांगवी, निवडुंगे, भालगाव बैजूबाभुळगाव, कोरडगाव, कोल्हार, तिसगाव, जिरेवाडी या अकरा ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या दरम्यान संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी 18 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन सरपंच व सदस्य निवडले जाणार आहेत. तालुक्यातील भालगाव,तिसगाव, कोरडगाव आणि कोल्हार या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहेत. एकूण अकरा गावांची मतदार संख्या 33 हजार 272 एवढी आहे.

पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी असलेल्या भालगाव ग्रामपंचायतीत भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांची सत्ता आहे. ग्रामपंचायतीत त्यांची भावजय मनोरमा खेडकर या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत. यापूर्वी ओबीसीसाठी राखीव असलेले सरपंच पद आता बदलून अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित झाले आहे. तर, तिसगाव ही ग्रामपंचायत सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.

येथे यापूर्वी सरपंचाचे सर्वसाधारण व्यक्तीसाठी असलेले आरक्षण बदलून आता सर्वसाधारण महिला असे पडलेले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. कोरडगाव ग्रामपंचायतीत यापूर्वी सरपंच पदासाठी असलेले सर्वसाधारण आरक्षण आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे झाले आहे. भालगाव, कोरडगाव, तिसगाव ही तीन गावे पंचायत समितीचे गण म्हणून आहेत. त्यामुळे आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे.

अकरा ग्रा.पं. सरपंच आरक्षण
मोहरी – मतदार 2260, प्रभाग 3 आणि 9 सदस्य (सरपंच आरक्षण – अनुसूचित जाती महिला), वडगाव – मतदार 2752, प्रभाग 3 आणि 9 सदस्य (सरपंच आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग), सोनोशी – मतदार 1895, प्रभाग 3 आणि 9 सदस्य (सरपंच आरक्षण – सर्वसाधारण महिला), कोळसांगवी – मतदार 953, प्रभाग 3 आणि 7 सदस्य (सरपंच आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), निवडुंगे – मतदार 4123, प्रभाग 4 आणि 11 सदस्य (सरपंच आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग), भालगाव – मतदार 4603, प्रभाग 5 आणि 13 सदस्य (सरपंच आरक्षण – अनुसूचित जाती), बैजूबाभुळगाव – मतदार 1474, प्रभाग 3 आणि 7 सदस्य (सरपंच आरक्षण – सर्वसाधारण महिला), कोरडगाव – मतदार 3481, प्रभाग 4 आणि 11 सदस्य (सरपंच आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), कोल्हार – मतदार 2554, प्रभाग 3 आणि 9 सदस्य (सरपंच आरक्षण – अनुसूचित जाती), तिसगाव – मतदार 7707, प्रभाग 6 आणि 17 सदस्य (सरपंच आरक्षण – सर्वसाधारण महिला), जिरेवाडी – मतदार 1470, प्रभाग 3 आणि 7 सदस्य (सरपंच आरक्षण – सर्वसाधारण महिला).

Back to top button