पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील गैबीबाबा (गहिनीनाथ) यात्रेत शिवीगाळ करणार्यास समजावण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून धमकावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्पाक अकबर शेख, राईसा शेख, मुन्नाबी शेख (सर्व रा. पागोरी पिंपळगाव) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींत समावेश आहे. पागोरी पिंपळगाव येथील गैबीबाबा यात्रेत गुरुवारी (दि.10) ऑर्केस्ट्रा सुरू होता. साहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार, कुमार कराड, पोलिस नाईक अनिल बडे, अलताफ शेख, कॉन्स्टेबल अमोल शिवाजी कर्डिले, एकनाथ बुधवंत हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तावर हजर होते.
रात्री 11.45 च्या सुमारास गावातील मारुती मंदिरासमोर आस्पाक शेख हा आला. 'ऑर्केस्ट्रा बंद करा, मी गावचा दादा आहे. तुम्ही कोणाला विचारून गाणे लावले', असे म्हणून त्याने शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्याला समजावून सांगत असताना शेख याने शिवीगाळ करून पोलिस कर्मचारी कर्डिले, बडे यांना धक्काबुक्की करून बडे यांची गचांडी धरली. तुमच्याकडे पाहतो, एकेकाचा मर्डर करतो, अशी धमकी दिली. आस्पाक शेख याला सरकारी गाडीतून घेऊन जाताना त्याची बहीण राईसा शेख, चुलती मुन्नाबी शेख, तसेच दोन ते तीन इसमांनी पोलिसांशी झटापट करुन त्याला घेऊन जाण्यास विरोध केला. रस्ता अडवून सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमोल कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आस्पाक अकबर शेख, राईसा शेख, मुन्नाबी शेख व इतर दोन ते तीन अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आस्पाक शेख याला अटक केली आहे.