पंतप्रधान मोदींच्या धोरणाविरोधात यात्रा; हिंगोलीत राहुल गांधींचा घणाघात | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या धोरणाविरोधात यात्रा; हिंगोलीत राहुल गांधींचा घणाघात

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : भाजप आणि आरएसएस देशात भय आणि द्वेष पसरवित आहे. त्यांच्या धोरणाविरोधात माझी लढाई आहे, असा घणाघात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी भारत जोडो यात्रेतील कॉर्नर बैठकीत केला.

राहुल गाधींची यात्रा शुक्रवारी (दि.११) रोजी रात्री वारंगाफाटा येथे पोहोचली होती. यावेळी कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात सर्व सामान्य जनतेसाठी काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा कुठल्याही परिस्थितीत थांबविण्याची ताकद कोणामध्येही नाही. ही यात्रा श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवेल.

राहुल गांधी पुढे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी वाढत आहे. जीएसटीमुळे देशात छोटे व्यापारी, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या विरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजप, आरएसएस जनतेमध्ये द्वेष व भय निर्माण करीत आहेत. त्या विरोधातच ही यात्रा काढण्यात आली आहे. संपूर्ण देशात जाणाऱ्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ही यात्रा रोखण्याची ताकद कोणत्याही शक्तीमध्ये नाही. यात्रा आता श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवेल. यात्रेला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे मी आभार मानतो. हिंगोली जिल्ह्यात माजी खासदार राजीव सातव नाहीत याचे दुःख होत असून त्यांची आठवण कायम राहणार आहे.” असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचलंत का? 

Back to top button