पुणे : तक्रार देणार्‍या पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार | पुढारी

पुणे : तक्रार देणार्‍या पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून पतीविरोधात तक्रार देणार्‍या पत्नीवर भररस्त्यात पतीने चाकूने वार केल्याची घटना पर्वती भागात घडली. याप्रकरणी पतीस अटक केली असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अक्षय मोहन सोनार (वय 27, रा. गोलघर, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत कार्तिका अक्षय सोनार (वय 22) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी गजानन महाराज मंदिराच्या मागील गेटसमोर शिवदर्शन येथे घडली. अक्षय आणि कार्तिका यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. दोघेही पर्वती भागातील गोलघर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत.

दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. कार्तिका आई-वडिलांना घेऊन पतीविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघाल्या होत्या. त्यावेळी अक्षयने कार्तिकावर हल्ला चढविला. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. पसार झालेल्या अक्षयला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक निकाळजे तपास करीत आहेत.

Back to top button