खरडगावमध्ये दोघा वाळूतस्करांवर कारवाई ; शेवगाव पोलिसांची धडक मोहीम | पुढारी

खरडगावमध्ये दोघा वाळूतस्करांवर कारवाई ; शेवगाव पोलिसांची धडक मोहीम

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील खरडगाव येथील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या जेसीबी व डंपरवर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी व वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर शुक्रवार (दि.11) पहाटे 6 च्या सुमारास खरडगाव येथील नानी नदीतून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करून 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रभारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन काकडे यांच्या फिर्यादीवरुन अश्पाक सुलेमान शेख (रा. वडुले बुद्रुक, ता. शेवगाव) व गणेश चंद्रकांत केदार ( रा. लोळेगाव, ता. शेवगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना खरडगाव येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवार (ता.11) रोजी पहाटे 6 च्या सुमारास मिटके यांनी पथकासह नानी नदीपात्रात पाहणी केली असता, तेथे एक पिवळ्या रंगाचा विना क्रमांकाच्या जेसीबीने अश्पाक सुलेमान शेख हा वाळू उपसा करताना आढळून आला.

तर गणेश चंद्रकांत केदार हा विनाक्रमांकाचा एक आकाशी रंगाच्या डंपरमध्ये तीन ब्रास वाळू घेऊन निघाला होता. त्याच वेळी पथकाने शेख व केदार यांच्यासह 20 लाख रुपये किंमतीचा जेसीबी व 6 लाख 15 हजार रुपये किंमतीचा डंपर असा एकूण 26 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी शेख व केदार यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ए. एल भाटेवाल, हवालदार सुरेश औटी, कर्मचारी नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उर्किर्डे या पथकाने केली.

वाळूतस्करांचे दणाणले धाबे
तालुक्यात बेकायदा वाळूउपसा व वाहतूक जोरात सुरू आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळूतस्करी केली जात आहे. याची पोलिसांनी दखल घेतली असून, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने खरडगावात कारवाई केली. त्यामुळे तालुक्यातील वाळूूतस्करांचे चांगलेच धाबे दणणाले आहेत.

Back to top button