Marriage card : डिजिटल युगातही कागदी पत्रिकांचे महत्त्व टिकून

लग्नपत्रिका,www.pudhari.news
लग्नपत्रिका,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लगीनघाई हा आपल्याकडे मोठा जिव्हाळ्याचा विषय. पण, जोपर्यंत लग्नवार्ता इतरांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत लग्नाच्या तयारीची सुरुवात झाली, असे म्हणता येत नाही. त्याकरिता महत्त्वाची ठरते ती लग्नपत्रिका (Marriage card). मात्र, डिजिटल युगात लग्नपत्रिकेचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे बोलले जात असले तरी, कागदी पत्रिकेचा मान काही औरच आहे. सध्या लग्नसराईमुळे पत्रिका वाटपाचे जोरदार काम सुरू असून, आगामी काही दिवसांत दोन हजार प्रकारच्या तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक लग्नपत्रिका यजमानांकडून पाहुणे मंडळींना वाटल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे लग्नपत्रिका विक्रीतून तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम बघावयास मिळत असून, २६ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात लग्नसराईचा बार उडवून दिला जाणार आहे. यजमान कुटुंबीयांकडून सध्या पत्रिका खरेदी करण्यावर जोर दिला जात आहे. बाजारात दोन हजारांपेक्षा अधिक विविध रंगाढंगाच्या पत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ११० रुपये शेकड्यापासून, ५०० ते ५५० रुपये नगापर्यंतच्या लग्नपत्रिका बाजारात बघावयास मिळत आहेत. कोरोना काळात लग्न अत्यंत साध्या पद्धतीने उरकावे लागल्याने, यंदा मात्र हौसमौज करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने महागड्या लग्नपत्रिका घेण्याकडे यजमानांचा विशेष कल दिसून येत आहे. जसजशा लग्नघटिका समीप येत आहेत, तसतशा लग्नपत्रिका खरेदीसाठी यजमानांकडून घाई केली जात आहे. विशेष बाब म्हणजे लॉकडाऊन काळात लग्नपत्रिका खरेदीचा आकडा जेमतेम होता. आता मात्र त्यात मोठी भर पडल्याने व्यापारीवर्गही सुखावताना दिसत आहे.

कागदांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लग्नपत्रिकांचे दर ३० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. मात्र, या दरवाढीचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने, पुढच्या काही दिवसांमध्ये लग्नपत्रिकांमधून पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असल्याचे व्यापारीकडून सांगितले जात आहे. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक लग्नपत्रिकांची विक्री झाली असून, त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. एकूणच काळ बदलत असला तरी, लग्नपत्रिकांची जोरदार छपाई सुरू असून, लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही कायम आहे.

हटके लग्नपत्रिका

पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिका न छापता हटके पद्धतीने लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड चांगलाच रुजताना दिसत आहे. विशेषत: लग्नपत्रिकेवर वधू-वराचा फोटो टाकण्याचा यजमानांकडून आग्रह धरला जात आहे. त्याचबरोबर लग्नपत्रिकेवर सामाजिक जनजागृतीपर संदेशही दिला जात आहे. वारली चित्र असलेल्या लग्नपत्रिकाही अनेकांना भावत आहे. तर काही जोडप्यांकडून मोजकेच नावे असलेली साधी लग्नपत्रिका छापायला प्राधान्य दिले जात आहे. इकोफ्रेंडली लग्नपत्रिकेचाही ट्रेंड चांगलाच रुजत आहे.

डिजिटल आवतन

बऱ्याच कुटुंबीयांकडून लग्नपत्रिका दिल्यानंतरही डिजिटल आवतन दिले जात आहे. सोशल मेसेन्जर, सोशल साइटवर हे आवतन दिले जात आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात आपली लग्नाची पत्रिका पोहोचवायचा हा डिजिटल लग्नपत्रिकांचा बदलता ट्रेण्ड वापरला जात असला तरी, आयुष्यभरासाठीची आठवण म्हणून कागदी लग्नपत्रिकेचा मोह अजूनही कायम आहे.

लॉकडाऊन काळात लग्नपत्रिका खरेदी करण्याचा आकडा फारच कमी होता. यंदा मात्र, तो वाढला आहे. कागदाचे दर वाढल्याने लग्नपत्रिका ३० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये लग्नपत्रिका विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. त्याचबरोबर डीटीपी, डिझाइन आणि प्रिंटिंगच्या माध्यमातूनही मोठी उलाढाल अपेक्षित आहे. डिजिटल युगात लग्नपत्रिकांकडे कल कायम आहे.

– धनंजय सोमवंशी, प्रोपरायटर, भारत एजन्सी

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news