Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग | पुढारी

Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
भाताचे आगर असणार्‍या इगतपुरी तालुक्यात दिवाळी सणाचा फीव्हर संपताच भात सोंगणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या भातपिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांपुढे आता वाढलेल्या मजुरीच्या खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळे सोंगणी करणेदेखील तोट्याचे होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागली, वरई, खुरसणी आदी पिकांची लागवड कमी झालेली आहे. यावर्षी पेरणीक्षेत्र 27 हजार 560 हेक्टर इतके आहे. साधारणतः 8 ते 10 वर्षांपूर्वी 30 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते. ते कमी होऊन 27 ते 28 हजार हेक्टरवर आले आहे.

पीक रोगराईने ग्रासलेल्या शेतकर्‍यास पीकविमा संरक्षणाचा आधार मिळेल. मात्र, यावर्षी 10 टक्क्यांच्या आसपास पीकविमा आहे. त्यामुळे याबाबत उदासीनता असल्याचे दिसते आहे. पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून, कीटकनाशकांची फवारणी करावी लागल्याने भांडवल खर्चात वाढ झाली आहे. यांत्रिक शेतीने एकरी खर्च वाढला असून, पेरणीपूर्व मशागत आणि आवणी यास किमान चार हजार रुपये ट्रॅक्टर मजुरी लागत आहे. मजुरी खर्च आवणीसाठी 10 हजार रुपये, निंदणीसाठी 3 हजार रुपये, सोंगणीसाठी 6 हजार रुपये असा आहे. बी-बियाणे, खते यांना 2 हजार रुपये असा सरासरी एकूण 25 हजार रुपये खर्च येतो.

यामध्ये वाढच होत आहे. भाताचे एकरी उत्पन्न 10 क्विंटलच्या आसपास आहे. मुरमाड जमिनीत ते यापेक्षा कमी येते. तालुक्यातील जमिनीची प्रतवारी पाहता हळीव वाणाच्या भाताचे प्रमाण अधिक आहे. या भाताला भाव कमी मिळतो. भाताला प्रतिक्विंटल दरवर्षी 1500 ते 1800 रुपये भाव मिळतो. तरीदेखील अवघे 20 हजार रुपये हाती पडत असल्याचे शेतकरी सांगतात.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते. वेळोवेळी पडणार्‍या पावसाने नुकसान झाले तसेच पिकांना काही प्रमाणात लाभही झाला. करपा, तुडतुड्या आदी रोगांनी भातपिकाला मोठी हानी पोहोचवली आहे. भरभरून आलेले पीक रोगाने वाया गेले आहे. त्यातच मजुरीदेखील
डोईजड झाली आहे.
– अशोक सुरुडे, उभाडे, शेतकरी

हेही वाचा :

Back to top button