पुणे : बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगारही नाही; पालिका अतिरिक्त आयुक्तांचा खातेप्रमुखांना आदेश

पुणे : बायोमेट्रिक हजेरी नाही, तर पगारही नाही; पालिका अतिरिक्त आयुक्तांचा खातेप्रमुखांना आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर्मचार्‍यांना वेळेची शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून, ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांची अद्याप बायोमेट्रिक हजेरी सुरू केलेली नाही, त्यांचे वेतन चालू महिन्यापासूनच थांबविण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या सेवेतील कर्मचार्‍यांची संख्या वीस हजारांहून अधिक आहे. यामध्ये मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालय आणि अन्य कार्यालयांमधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मात्र, अनेकदा अधिकारी-कर्मचारी वेळेत कामावर येत नाहीत आणि सुट्टीची वेळ होण्याआधीच कार्यालयातून बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळते. याशिवाय कामावर न येताही दुसर्‍या दिवशी हजेरी वहीत स्वाक्षरी करण्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कार्यालयांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केली होती. मात्र, कोरोनाच्या काळात ही यंत्रणा बंद होती.

याबाबत दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पुन्हा आता बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अनेक कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी लावत नाहीत. त्यावर आता अति. आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व खातेप्रमुखांना त्यांच्याकडील बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन झालेल्या कर्मचार्‍यांची माहिती मागविली आहे. तसेच ज्यांचे अद्याप रजिस्ट्रेशनच झालेले नाही, अशा अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन येत्या 15 नोव्हेंबरपासूनच थांबविण्याचा आदेश दिला आहे. यासंबंधीची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news