हिंगोली: आगीत वाडा जळून खाक; दीड कोटींचे नुकसान; १०० जण बचावले | पुढारी

हिंगोली: आगीत वाडा जळून खाक; दीड कोटींचे नुकसान; १०० जण बचावले

जवळा बाजार, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका वाड्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेली भीषण आग तब्बल दहा तासानंतर मंगळवारी आटोक्यात आली. मात्र, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घराला आग लागल्याचे दिसताच घरात असलेले 100 जण सर्व संपत्तीवर पाणी सोडून जीवाच्या आकांताने घराबाहेर पडले. जीव वाचला हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया देताना घरातील सदस्य लक्ष्मण परिहार यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

जवळाबाजार येथे लक्ष्मण परिहार यांचे कुटुंब एकत्रित राहतात. जुना माळवदाचा वाडा असलेल्या घरामध्ये लहान-मोठे 100 सदस्य आहेत. दिवाळीनिमित्त घराची सर्व साफसफाई केल्यानंतर कुटुंबातील सदस्य सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करत होते. यावेळी घराच्या एका खोलीतून अचानक धूर निघू लागला. घराला सागवान लाकडाचे माळवद असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच जेवण करत असलेले कुटुंबातील सदस्य आहे, त्या स्थितीत घराच्या बाहेर पडले.

आगीचा मोठा भडका उडाल्याचे लक्षात येताच परिसरातील गावकरी देखील जमा झाले. सुरुवातीला मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास कुटुंबीयांनी व गावकर्‍यांनी सुरुवात केली. मात्र, आग अधिकच भडकत गेली. आगीबाबत माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बाराटे, उपनिरीक्षक संदीप तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने औंढा नागनाथ, परभणी, वसमत, कळमनुरी व हिंगोली येथे अग्निशमन दलाला संपर्क साधला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दल दाखल झाले.

त्यानंतर रात्री साडेअकरा वाजल्यापासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र घरातील लाकडी साहित्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. तब्बल नऊ तासानंतर मंगळवारी पहाटे आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर व घरातील सर्व उपयोगी साहित्यसह रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले. या आगीमध्ये सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज लक्ष्मण परिहार यांनी व्यक्त केला आहे.

घराला आग लागल्यानंतर सर्व कुटुंब जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, घरातील सोन्या चांदीच्या दागिन्याचे अक्षरशः पाणी झाले. घरातील रोख रक्कम देखील जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button