Rishi Sunak-Ashish Nehra : आशिष नेहरा झाला ब्रिटनचा पंतप्रधान! नेटक-यांकडून मिम्स व्हायरल

Rishi Sunak-Ashish Nehra : आशिष नेहरा झाला ब्रिटनचा पंतप्रधान! नेटक-यांकडून मिम्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishi Sunak-Ashish Nehra : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) यांची आज (दि.25) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स III यांनी अधिकृत घोषणा केली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर किंग चार्ल्स यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हुजूर पक्षाचे नेते (Conservative Party leader) सुनक यांना बकिंगहॅम पॅलेसमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर किंग चार्ल्स III यांनी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील अशी घोषणा केली. याचबरोबर सुनक हे ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान बनले असून दोन शतकांतील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटवर प्रवेश केला आहे. 10 डाउनिंग स्ट्रीट हे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे शासकीय निवास्थान आहे. दरम्यान, भारतात दिवाळी साजरी होत असताना ही बातमी समोर आली आणि सर्वजण आनंदी झाले आहेत. पण यासोबतच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. ज्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. कारण इथे लोक ऋषी सुनक नव्हे तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आशिष नेहराचे अभिनंदन करत आहेत.

खरंतर आशिष नेहरा आणि ऋषी सुनक यांचा चेहरा काहीसा सारखाच आहे. दोघांचेही स्मितहास्य, चेह-याची ठेवण आणि हेअरस्टाईल अनेक छायाचित्रांमध्ये अगदी सारखीच दिसते. त्यामुळेच नेटकरी ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल सुनक यांचे नाही तर आशिष नेहराचे अभिनंदन करत आहेत.

ब्रिटनचे नवे पंतप्रधान आणि भारताचा माजी क्रिकेटप्टू आशिष नेहरा यांच्यावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. चाहते म्हणतात की, लखनऊ संघाला आयपीएल जिंकून देणारा कोच आणि आता ब्रिटनचे पंतप्रधान झालेल्या आशिष नेहराजी यांचे खूप खूप अभिनंदन. दुसरीकडे काही लोकांनी लिहिलंय की, कुंभमेळ्यात ऋषी सुनक आणि आशिष नेहरा एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण आता ते ब्रिटनच्या पंतप्रधान पदामुळे एकत्र आले आहेत.

ऋषी सुनाक हुजूर पक्षातील हुकमाचा एक्का आहेत. 2015 मध्ये त्यांना यॉर्क्सच्या रिचमंड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ऋषी तेव्हापासून या जागेवर सातत्याने निवडून येत आहेत.

बोरिस जॉन्सन यांनी ऋषी यांना 2019 मध्ये 'चिफ सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी' म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना प्रिव्ही कौन्सिलचे सदस्यपदही देण्यात आले. 13 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत त्यांना अर्थमंत्री करण्यात आले.

आशिष नेहरा हा भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो मागच्या आयपीएल हंगामापासून गुजरात टायटन्स (GT) संघाचा कोच म्हणून काम पाहत आहे. त्याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असणा-या गुजरात संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news