Cyclone Sitrang | मान्सूननंतर दिवाळीत ‘सितरंग’ चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांवर होणार परिणाम | पुढारी

Cyclone Sitrang | मान्सूननंतर दिवाळीत 'सितरंग' चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; मान्सूननंतरचे पहिले चक्रीवादळ (Cyclone Sitrang) या आठवड्याच्या अखेरीस पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आंध्र प्रदेशच्या उत्तर तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे. पण हे चक्रीवादळ नेमक्या कोणत्या ठिकाणी जमिनीवर धडकेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती भारत हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याचे नाव सितरंग (Cyclone Sitrang) असणार आहे.

हवामान विभागाच्या चक्रीवादळ निरीक्षण विभागाचे प्रमुख आनंद कुमार दास यांनी म्हटले आहे की, मान्सूननंतर येणारी चक्रीवादळे ही गेल्या २० वर्षांत मान्सूनपूर्व हंगामातील चक्रीवादळांपेक्षा अधिक तीव्र आहेत. म्हणून नवीन चक्रीवादळ अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे.” आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकून मध्य बंगालच्या उपसागरावर शनिवारी सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

चक्रीवादळाच्या ठिकाणाबाबत या क्षणी मॉडेल्समध्ये अनेक फरक दिसून येत आहेत. पण त्यापैकी बहुतेक असे सूचित करत आहेत की उत्तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर रोजी ते जमिनीवर धडकू शकते. पण ते नेमक्या कोणत्या ठिकाणी धडकणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण ही प्रणाली अद्याप तयार झालेली नाही, असे आनंद कुमार दास यांनी सांगितले.

दास म्हणाले की, चक्रीवादळ तयार होण्यासाठी वातावरण आणि सागरी परिस्थिती अनुकूल दिसत आहे. “किनाऱ्याजवळील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त आहे. शिवाय, ही यंत्रणा २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत महासागरावर फिरत राहणार आहे. ज्यामुळे चक्रीवादळाला अनुकूल वातावरण मिळू शकते.

विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड, ओडिशाचा अंतर्गत भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालच्या अधिक भागांमधून मान्सूनच्या पुढील माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात या आठवड्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button