कोल्हापूर : का रेंगाळला परतीचा पाऊस?

कोल्हापूर : का रेंगाळला परतीचा पाऊस?

कोल्हापूर, आशिष शिंदे : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात कमालीचे वातावरणीय बदल पाहायला मिळत आहेत. दिवसभर कडाक्याचे ऊन, सायंकाळी धुवाँधार पाऊस आणि रात्री हुडहुडी भरवणार्‍या थंडीमुळे शहरवासीय अक्षरश: त्रस्त झाले आहेत. सध्या शहरात सुरू असलेली ढगफुटीसद़ृश अतिवृष्टी हा हवामान बदलाचा जबर तडाखा असून समुद्राचे वाढत चाललेले तापमान (इंडियन ओशन डायपोल), वारंवार निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, ला निना इफेक्ट आणि हिट आयलंड इफेक्टमुळे परतीच्या पावसाचा हा कहर सुरू असल्याचे हवामान तज्ज्ञांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

1. संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार केला आहे. ऑक्टोबर महिन्यात कडक ऊन आणि परतीच्या पावसाचा अनुभव अनेकदा कोल्हापूरकरांनी घेतला आहे; मात्र याची सुरुवात 2019 पासून झाली आहे. 15 ऑक्टोबर 2020 रोजी कोल्हापुरात 24 तासांमध्ये तब्बल 130.4 मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तर 20 ऑक्टोबर 2019 रोजी 46.4 मि. मी. पावसाची नोंद झाली
होती.

2. 2019 व 2020 वर्ष वगळता गेल्या दहा वर्षांत ऑक्टोबर महिन्यात इतक्या पावसाची नोंद झाली नाही. यंदा 13 ऑक्टोबरला सुमारे दोन तासांमध्ये तब्बल 51 मि. मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा हा कहर पाहता हवामान बदलाची झळ कोल्हापूरला बसत चालल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

3. यंदाच्या हंगामात उत्तर भारतामध्ये पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळाले आहे. या तुलनेत दक्षिण भारत आणि पश्चिम भारतात पाऊस वाढला आहे. याचे प्रमुख कारण हिंद महासागराचे वाढलेले तापमान, यामुळे वारंवार निर्माण होणारे कमी दाबाच्या पट्टे आणि ला निना इफेक्टमुळे परतीचा पाऊस महाराष्ट्रात रेंगाळला असून त्याचा हाहाकार सुरू आहे.

4. राज्यात सरासरीच्या तब्बल 23 टक्के जास्त पाऊस झाला आहे. याशिवाय गेल्या 50 ते 60 वर्षांत बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळे आता अरबी समुद्रात तयार होत आहेत. याशिवाय कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे किनारपट्टी भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे.

'इंडियन ओशियन डायपोल'मुळे पाऊस

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या तुलनेत हिंदी महासागराचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. या स्थितीला इंडियन ओशियन डायपोल म्हटले जाते. यामध्ये अरबी समुद्राचे तापमान जास्त असेल, तर इंडियन असोसिशन पॉझिटिव्ह डायपोल म्हणतात आणि बंगालच्या उपसागराचे तापमान जास्त असल्यास निगेटिव्ह डायपोल म्हणतात. सध्या पॉझिटिव्ह डायपोल स्थिती असून ही स्थिती पावसासाठी पोषक असते. 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीदेखील अशी स्थिती निर्माण झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news