वडगाव शेरी : रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; कल्याणीनगरमध्ये समस्या | पुढारी

वडगाव शेरी : रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; कल्याणीनगरमध्ये समस्या

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: कल्याणीनगरमध्ये मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहेत. त्यातच अनेक व्यवसायिकांनी पार्किगच्या जागेवर व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किग करण्यात येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर वाहने पार्किग केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिक आणि सामाजिक संस्थांनी बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

कल्याणीनगरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपनीतील कर्मचारी जेवण्यासाठी, नाष्टा करण्यासाठी हॉटेल आणि इतर व्यवसायिकांकडे येतात. आयटीतील ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या भागामध्ये छोटे मोठे हॉटेल आणि इतर व्यवसायिकांची संख्या वाढली आहे. या व्यवसायिकांनी जास्त फायदयासाठी पार्किंगमध्ये पोट भाडेकरू ठेवले आहेत. या पार्किगमध्ये बांधकाम करून दुकाने, मोबाईल शॉपी, चहावाले अशा विविध व्यवसायिकांना भाड्याने दिले आहेत. तसेच काही जणांनी पार्किगमध्ये बांधकाम करून व्यवसायाची जागा वाढवली आहे. या व्यवसायिकांकडे येणार्‍या ग्राहकांना रस्त्यावर वाहने पार्क करावे लागतात.

वाहने पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याने आता रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्किग सुरू झाली आहे. या पार्किगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे कल्याणीनगर येथील मारिप्लेक्स मॉल ते सिल्वर ओक, फोर्टीलिजा सोसायटी, लॅडमार्क सोसायटी, जॉगर्स पार्क या रस्त्यावर पार्किगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभाग या सर्व बाबीची तपासणी केल्यानंतर संबधिता बांधकाम पुर्णत्वचा नकाशा देते. मात्र, पुर्णत्वाचा दाखल्या घेतल्यानंतर व्यवसायिक पार्किगमध्ये धंदा सुरू करतात.

पार्किगच्या जागेवर व्यवसाय करणार्‍यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम अक्ट 1966 नुसार कारवाई केली जाते. मात्र, तरी बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. पार्किगची व्यवस्था नसल्यास व्यवसाय सुरू करता येत नाही. तरी, पार्किग शिवाय कल्याणीनगर येथे अनेक व्यवसाय सुरू आहे. या प्रकारच्या नागरीकांनी अनेक तक्रारी बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. मात्र, बांधकाम विभाग या तक्रारीवर कागदी घोडे नाचवते. या तक्रारींना केराची टोपली दाखवत आहे.

रस्त्यावर पार्किंगचा धंदा!
कल्याणीनगरमधील अनेक हॉटेल व्यवसायिकांकडे स्वतःची पार्किंग नाही. यामुळे या हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांच्या वाहनांची वॅले पार्किंग महापालिकेच्या रस्त्यावर केली जाते. या पार्किगसाठी ग्राहकांकडून पैसे वसूल केले जातात.

Back to top button