सांगली : तरुणांची पावले गुन्हेगारीकडे! … खुनांच्या घटनांची मालिकाच सुरूच | पुढारी

सांगली : तरुणांची पावले गुन्हेगारीकडे! ... खुनांच्या घटनांची मालिकाच सुरूच

सांगली; सचिन लाड :  मिसरूड न फुटलेल्या पोरांची पावले गुन्हेगारीकडे वळली आहेत. एकमेकांचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटलेली ही पोरं भरदिवसा मुडदा पाडत सुटली आहेत. गांजा, गोळ्यांचे सेवन करून कोणताही गुन्हा करण्यासाठी ते मागे-पुढे पाहेना झाले आहेत. 18 ते 19 वर्षाची पोरं कंबरेला हत्यारे लाऊन फिरताना पोलिसांना सापडत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून सांगली, मिरजेसह जिल्ह्यात तर खुनांची मालिकाच सुरू आहे.

दोन महिन्यापूर्वी शंभरफुटी रस्त्यावर संतोष पवार अंडाबुर्जी विक्रेत्याचा धारदार हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. यामध्ये अटक केलेले संशयित 18 ते 20 वयोगटातील होते. चार दिवसापूर्वी कवलापूर (ता. मिरज) येथे बुधगावच्या विठ्ठल जाधव याचा कोयत्याने वार करून खून झाला. यामध्ये अटक केलेला एक संशयित 23 वर्षाचा निघाला.

दोनच दिवसापूर्वी पद्माळे फाट्याजवळ अजय अंगडगिरी या 19 वर्षाच्या तरुणाचा शेतात बोलावून भोसकून खून केला. यातील अटक केलेले तीन हल्लेखोर 18 ते 19 वर्षाचे आहेत. कॉलेजमधील भांडणातून त्याचा जीव घेऊन हे तिघेही कारागृहाची हवा खात आहे. गंभीर गुन्हा दाखल झाल्याने भविष्यात नोकरीही मिळू शकत नाही. भविष्य अंधारमयात टाकून तरुण पोरं गुन्हे करताना दिसत आहेत. मिरजेत गेल्या तीन महिन्यात झालेल्या दोन खुनातील संशयित 20 वयोगटातील होते.

याशिवाय खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या प्रकरणात अटक केलेले संशयित 18 ते 22 वयोगटातीलच आहेत. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारे तरुण चैनीसाठी दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबत असल्याचे पोलिसांच्या कारवायावरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. महिन्यापूर्वी कॉलेज कॉर्नरवर एका महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांवर चाकूने सपासप वार करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला.

अनैतिक संबंध, आर्थिक वाद, प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद, चारित्र्याचा संशय, शेतीचा वाद, पूर्ववैमनस्यही खून आणि खुनाचा प्रयत्न करण्यामागची कारणे असली तरी बहुतांश प्रकरणात अटक केलेले संशयित 25 वयोगटातील आहेत. जिल्ह्यात गांजाचे सेवन करणार्‍यांविरूद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे. गांजा सेवन करताना विशीच्याआतील तरुण सापडले आहेत. दोनच दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दुचाकी चोरणार्‍या दोन अल्पवयीन तरुणांना अटक केली. एकमेकांच्या संगतीने अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसन करण्यासाठी पैसा कमी पडू लागल्याने गुन्हेगारीकडे पावले वळताना दिसत आहेत. महिलांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील दागिने पळविणे ‘चेनस्नॅचर’ कधीच सापडत नाहीत. फिर्यादीत ते 20 ते 22 वयोगटातील असल्याचे नमूद असते.

वाहन चोरी, चेनस्नॅचिंगमध्ये सहभाग

शहर आणि ग्रामीण भागात अलीकच्या काळात वाहन, महागड्या मोबाईलची चोरी व चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यात 17 ते 25 वयोगटातील उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग असल्याचे पोलिस कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. मुबलक कमाई देणार्‍या दारू व गुटखा तस्करीतही तरुणांचा वापर सुरू झाला आहे. अवैध व्यवसायात गुरफटलेल्या तरुणांचा विनासायास जादा कमाईची चटकच लागली आहे. आर्थिक लाभासाठी ते कोणताही गुन्हा करू लागले आहेत.

Back to top button