‘सोमेश्वर’च्या दहा गावांचे मरण; ‘सोमेश्वर’, ‘माळेगाव’च्या सर्वसाधारण सभांकडे लागले लक्ष | पुढारी

‘सोमेश्वर’च्या दहा गावांचे मरण; ‘सोमेश्वर’, ‘माळेगाव’च्या सर्वसाधारण सभांकडे लागले लक्ष

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अनेकदा राष्ट्रवादीला सभासदांनी नाकारले आहे. आता कार्यक्षेत्रातील कमी उसाच्या क्षेत्राचा मुद्दा पुढे करून कार्यक्षेत्रातील दहा गावे आम्हाला द्या, अशी मागणी माळेगावने सोमेश्वरकडे केली आहे. दोन्ही कारखान्यांनी हा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. सोमेश्वरची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 29) तर माळेगावची शुक्रवारी (दि. 30) होत आहे. या विषयावरून सध्या जिरायती भागातील दहा गावांची घालमेल सुरू आहे. सत्तेच्या सारीपाटात या दहा गावांमध्ये सध्या चलबिचल दिसून येत आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ही गावे सोमेश्वरशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली आहेत. आजवर या गावांनी सोमेश्वर कारखान्याचे अंतर लांब पडत असल्याचा मुद्दा कधीही उपस्थित केलेला नाही. उलट सोमेश्वर कारखान्याने या गावांमध्ये असणारी पाणी टंचाई लक्षात घेत अनेकदा तिकडील ऊस तोडीला प्राधान्य देत जिरायती भागातील सभासद जपला आहे. अशी स्थिती असताना केवळ माळेगाव कारखान्याच्या पत्रावर आता सोमेश्वरच्या सर्वसाधारण सभेपुढे हा विषय आला आहे.

माळेगाव कारखान्यानेही आपल्या विषयपत्रिकेत या विषयाचा समावेश केला आहे. माळेगाव पूर्वी सोमेश्वरची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. सोमेश्वरने ही गावे देऊ नयेत, अशी आग्रही मागणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी केली आहे. शिवाय वेळप्रसंगी यासंबंधी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे माळेगावच्या कार्यक्षेत्रात माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व सहकारी कृती समितीच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेत ही गावे जोडली जाऊ नयेत, अशी मागणी करत आहेत. कृती समितीच्या बैठकांपाठोपाठ सत्ताधार्‍यांकडूनही बैठका घेत ही गावे जोडली जाणे कसे आवश्यक आहे, हे सभासदांना पटवून देत आहेत. त्यामुळे या विषयावरून आता दोन्ही कारखान्यांच्या सभेत रणकंदन ठरलेले आहे.

माळेगावचे कार्यक्षेत्र तुलनेने लहान आहे. त्यामुळे ही दहा गावे जोडल्यास कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. हक्काचा ऊस माळेगावला मिळेल. त्यामुळे गेटकेन उसावरी अवलंबित्व कमी होईल, असा दावा माळेगावचे सत्ताधारी करत आहेत. परंतु माळेगावचा इतिहास पाहिला तर गेटकेनधारकांना हा कारखाना नेहमीच जवळचा वाटत आला आहे. फलटण, माळशिरस, करमाळा आदी भागातील शेतकरीसुद्धा माळेगावला ऊस देण्यास ऊत्सुक असतात, ही वस्तुस्थिती आहे.

सोमेश्वर व माळेगाव या दोन्ही कारखान्यांचे विस्तारीकरण झालेले आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांना यापुढील काळात उसाची गरज आहे. परंतु दहा गावातील सुमारे 1100 सभासद माळेगावला जोडले गेले तर राजकीय सोय महत्त्वाची ठरणार आहे. सोमेश्वरचे कार्यक्षेत्र बारामतीसह पुरंदर, खंडाळा, फलटण या तालुक्यात विभागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत फारशी अडचण येत नाही.

दुसरीकडे मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या माळेगावची निवडणूक राज्यभर गाजते. अनेकदा येथे पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सोमेश्वरकडून दहा गावे मिळाल्यास माळेगावच्या सत्ताधार्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरीकडे सोमेश्वरच्या सत्तेवरही फारसा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. या दोन्ही कारखान्यांचे सभासद यासंबंधी आता काय निर्णय घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

माळेगाव साखर कारखान्याने कार्यक्षेत्रवाढीचा दिलेला प्रस्ताव कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित गावांमधील सभासदांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल.
                                          – पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

माळेगाव कारखान्याची झालेली विस्तारवाढ पाहता कारखान्याला अधिकच्या उसाची गरज असल्याने माळेगाव कारखान्याला नजीकच्या गावांचा कार्यक्षेत्रामध्ये समावेश केल्यास ऊस वाहतुकीचा खर्च वाचून हक्काचा ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी संस्थेच्या हितासाठी यामध्ये राजकारण करणे चुकीचे असून, संस्थेचे हित कशात आहे, हे समजून घ्यावे. केवळ  विरोधाला विरोध करू नये.
                                                 – बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना

 

Back to top button