खेडला उत्साहात बैलपोळ्याच्या मिरवणुका | पुढारी

खेडला उत्साहात बैलपोळ्याच्या मिरवणुका

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: लम्पी संसर्गाचा प्रादुर्भाव होत असताना खेड तालुक्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकर्‍यांनी बैलांच्या मिरवणुका काढल्या. विविध रंगछटांनी रंगवलेले बैल, शिंगावर बाशिंग आणि झुली टाकून शेतकर्‍यांनी गावातून उत्साहात बैलपोळा साजरा केला. गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बैलपोळा साजरा झाला नव्हता. या वर्षी तुलनेने शेतकरी या सणाची वाट पाहात होता. याशिवाय गतवर्षात बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंद, उत्साहाचे वातावरण होते. गोठ्यात कमी झालेले बैल वाढल्याने झुंडीच्या झुंडी घेऊन मिरवणुका काढताना आणि बैलांपुढे पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचताना शेतकरी बेभान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बैलांच्या सजावट साहित्यासाठी राजगुरुनगर, चाकण आणि आळंदीसह मोठ्या गावांमध्ये बाजारपेठ फुलून गेली होती. काही हौशी शेतकर्‍यांनी डीजेच्या तालावर मिरवणुका काढून परिसर दणाणून सोडला. बर्‍याच प्रतीक्षेनंतर ग्रामीण भागात बैलपोळा खर्‍या अर्थाने अनुभवायला मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व प्रसिद्ध बैलगाडामालक अशोक राक्षे यांनी राक्षेवाडी येथे जंगी मिरवणूक काढली. बाळासाहेब थिगळे, दत्तोबा सातकर, सुरेश सांडभोर, वैभव वाटेकर, भाऊ वाटेकर, कोंडीभाऊ राक्षे आदी कानिफनाथ तरुण मंडळ, वाटेकरवाडी, वाघेश्वर मित्रमंडळ राक्षेवाडीचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Back to top button