Maharashtra Weather Forecast | मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती, पुढील ३ दिवस ‘या’ भागांत पाऊस पडणार | पुढारी

Maharashtra Weather Forecast | मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती, पुढील ३ दिवस 'या' भागांत पाऊस पडणार

पुणे : Maharashtra Weather Forecast : वायव्य भारतातील काही भाग आणि कच्छमधून नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून माघारी परतण्यासाठी पुढील दोन दिवसांत अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. दरम्यान, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, छत्तीसगडमध्ये २१ पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पूर्व भागात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Update)

साडेतीन महिन्यांचा मुक्काम ठोकून सर्व देशाला भरपूर पाऊस देऊन मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघत आहे. २१ सप्टेंबर रोजी तो पश्चिम राजस्थानातून प्रस्थानाला सुरुवात करणार आहे. तेथून पुढे आठ दिवसांत तो महाराष्ट्रातून जाईल. दरम्यान, महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळविरोधी प्रवाह सक्रिय झाल्याने (अँटी सायक्लोनिक फ्लो) मान्सून परतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली  आहे.

त्यामुळे आगामी तीन दिवसांत म्हणजे २१ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होत आहे. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या ठिकाणांहून तो आगामी पाच दिवसांत परतीला निघेल. महाराष्ट्रातून जाण्यास आठवडा लागेल
मान्सून राजस्थानातून परतीला २१ रोजी निघणार आहे. तो महाराष्ट्रातून निघण्यास किमान सात ते आठ दिवस लागतील. २८ सप्टेंबरदरम्यान तो महाराष्ट्रातून पुढे सरकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा हलका ते मध्यम पावसाचा असेल.

महाराष्ट्रात आगामी चार दिवस पाऊस

बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तसेच महाराष्ट्र-गुजरात समुद्रकिनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील. तसेच हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे.

असा राहील पाऊस…(Maharashtra Weather Forecast)

– कोकण : १९ व २० सप्टेंबर हलका ते मध्यम (२१ रोजी मुसळधार)
– मध्य महाराष्ट्र : १९ व २० सप्टेंबर हलका ते मध्यम (२१ रोजी मुसळधार)
– मराठवाडा : १९ व २० सप्टेंबर हलका ते मध्यम (२१ व २२ मुसळधार)
– विदर्भ : १९ ते २२ सप्टेंबर (मुसळधार)

हे ही वाचा :

Back to top button