पुणे : 21 पासून मान्सून परतीच्या प्रवासाला; हवामान विभागाची अधिकृत घोषणा | पुढारी

पुणे : 21 पासून मान्सून परतीच्या प्रवासाला; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: साडेतीन महिन्यांचा मुक्काम ठोकून सर्व देशाला भरपूर पाऊस देऊन मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघत आहे. 21 सप्टेंबर रोजी तो पश्चिम राजस्थानातून प्रस्थानाला सुरुवात करणार आहे. तेथून पुढे आठ दिवसांत तो महाराष्ट्रातून जाईल. दरम्यान, महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळविरोधी प्रवाह सक्रिय झाल्याने (अँटी सायक्लोनिक फ्लो) मान्सून परतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली  आहे.

त्यामुळे आगामी तीन दिवसांत म्हणजे 21 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होत आहे. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या ठिकाणांहून तो आगामी पाच दिवसांत परतीला निघेल. महाराष्ट्रातून जाण्यास आठवडा लागेल
मान्सून राजस्थानातून परतीला 21 रोजी निघणार आहे. तो महाराष्ट्रातून निघण्यास किमान सात ते आठ दिवस लागतील. 28 सप्टेंबरदरम्यान तो महाराष्ट्रातून पुढे सरकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा हलका ते मध्यम पावसाचा असेल.

महाराष्ट्रात आगामी चार दिवस पाऊस
बंगालच्या उपसागरात 20 सप्टेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तसेच महाराष्ट्र-गुजरात समुद्रकिनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील. तसेच हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे.

असा राहील पाऊस…
– कोकण : 19 व 20 हलका ते मध्यम (21 रोजी मुसळधार)
– मध्य महाराष्ट्र : 19 व 20 हलका ते मध्यम (21 रोजी मुसळधार)
– मराठवाडा : 19 व 20 हलका ते मध्यम (21 व 22 मुसळधार)
– विदर्भ : 19 ते 22 (मुसळधार)

परतीच्या प्रवासासाठी लागणारे चक्रीवादळविरोधी प्रवाह सक्रिय झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास आगामी तीन दिवसांत वायव्य भारतातून सुरू होईल.
– डॉ. के. एस. होसाळीकर, प्रमुख, पुणे वेधशाळा

Back to top button