पुणे : पिस्तूल बाळगणारा तडीपार सराईत अटकेत | पुढारी

पुणे : पिस्तूल बाळगणारा तडीपार सराईत अटकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली. रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. 207, सोमवार पेठ. सध्या रा. निगडी प्राधिकरण) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी रिव्हॉल्व्हर, एक गावठी पिस्टल मॅगझिनसह व एक रिकामे मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.

15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार उघडकीस आला. याबाबत, पोलिस अंमलदार समीर मझीदुल्ला पटेल यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. 22 फेब—ुवारी 2021 वर्षी त्याविरोधात शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

त्याचा भंग करत असताना 15 सप्टेंबर रोजी तो मंगळवार पेठ परिसरात पोलिसांना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याकडे 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी रिव्हॉल्व्हर, 40 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व 5 हजार रुपये किमतीचे मॅगझिन असा 70 हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील कल्पना झोरे यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

Back to top button