उल्हासनगरमध्ये पुजाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा; ४० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी | पुढारी

उल्हासनगरमध्ये पुजाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा; ४० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

उल्हासनगर ; पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर शहरातील गुन्हेगारी काही थांबयाचे काही नाव घेत नाही. मंगळवारी (दि.३०) भल्या पहाटे सिंधी पुजाऱ्याच्या घरात घुसून गळ्यावर चॉपर ठेवत तब्बल ४० लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेवर दरोडा टाकून दरोडेखोर गाडीतून पसार झाले.

जॅकी कोंडूमल जग्यासी हे कॅम्प ४ मधील श्रीराम चौक येथील स्वामी दमाराम दरबारचे पुजारी आहेत. त्यांच्या घरी मंगळवारी भल्या पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास दरबार मधील घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. सहा ते सात दरोडेखोर तलवारी चॉपर घेऊन घुसले. त्यांनी घरातील चिराग आणि जॅकी यांना मारहाण केली. जॅकी यांची सात वर्षीय मुलगी जिया हिच्या गळ्यावर तलवार ठेवली. धाक दाखवत घरातील तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड चोरी करून धूम ठोकली. विशेष म्हणजे जग्यासी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर देखील या दरोडेखोरांनी आपल्या सोबत नेला आहे.

दरोडाची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, मधुकर कड आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा सशस्त्र दरोडा असल्याने कल्याण गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे शाखा त्याचबरोबर उल्हासनगर गुन्हे शाखा या घटनास्थळी दाखल होत समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक मौराळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून काही पुरावे मिळतात का ? याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र उल्हासनगर शहरात हत्या, हत्याचा प्रयत्न, दरोडे आणि चोरांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हे शहर नक्की सुरक्षित आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Back to top button