नाशिक : लासलगावला तब्बल २२ दिवसांपासून नळ कोरडेच, नागरिक हंडाभर पाण्याच्या शोधात

लासलगाव : गेल्या २२ दिवसांपासून शहरवासीयांना पाणी मिळत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ लासलगावकरांनी पाळलेला कडकडीत बंद.
लासलगाव : गेल्या २२ दिवसांपासून शहरवासीयांना पाणी मिळत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ लासलगावकरांनी पाळलेला कडकडीत बंद.

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा
लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेश्वर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

जलवाहिनीत ठिकठिकाणी होत असलेली गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. लहान लहान मुले, महिला व पुरुष वर्ग आपले काम धंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण करताना दिसत होते. तर लासलगाव व परिसरातील नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून सर्व सामान्य नागरिक मात्र पाणी प्रश्नासाठी लढताना दिसत आहे.

चुकीच्या नियोजनाचा फटका रहिवाशांना बसत आहे. याच्याच निषेधार्थ आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 17 कोटी रुपये खर्च केलेली जलवाहिनी अवघ्या सहा महिन्यात फुटत असल्याने याची चौकशी व्हावी. – विकास कोल्हे, ग्रामस्थ

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला. यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले. मात्र शनिवारी (दि.११) दुपारपर्यंत गावात कुठेही पाणी आलेल नाही.

पाणी प्रश्नाच्या निषेधार्थ आम्ही लासलगाव शहर समिती व नागरिक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहे. -दत्ता पाटील, रहिवाशी

कोट्यवधी रुपयांचा खर्च नवीन जलवाहिनीनसाठी केला तरी ग्रामस्थांना वीस-वीस दिवस पाणी येत नाही. त्यामुळे या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी झाली पाहिजे. -राजू कराड, रहिवाशी

खासदारांची प्रचारफेरी स्थगित
सत्ताधाऱ्यांची प्रचार फेरी शनिवारी लासलगावमध्ये नियोजित होते. मात्र पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे लक्षात येताच आणि ग्रामस्थांचा रोष अंगावर ओढू नये, यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली नियोजीत प्रचारफेरी स्थगित केली.

प्रॉपर्टीचे व्यवहार ठप्प
गेल्या अनेक वर्षापासून लासगावकरांचा पाणी प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. यामुळे लासलगाव परिसरातील प्रॉपर्टी, प्लॉट,बंगले,फ्लॅट रो हाऊस याचे व्यवहार ठप्प झालेले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news