परभणी : विजेच्या धक्क्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : विजेच्या धक्क्याने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील अलविरा शिवारात गुरुवारी (दि.२६) सकाळी विजेच्या धक्का लागून जयानंद उर्फ भानुदास सखाराम निकाळजे (वय ४२) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रजावती जयानंद उर्फ भानुदास निकाळजे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी एकनाथ इंगळे यांच्याविरद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जयानंद उर्फ भानुदास निकाळजे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चारठाणा पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडला होता. तत्काळ गुन्हे दाखल करा. अन्यथा आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून रात्री साडेअकरा वाजता एका संशयितावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपीने विजेच्या खांबावर काम करण्यासाठी कोणतीही सुरक्षेतेची साधने दिली नव्हती. तसेच महावितरणाला कोणतीही पूर्वसूचना न देता तार ओढायचे काम जयानंद उर्फ भानुदास निकाळजे यांना दिले होते. त्यामुळे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button