Yogi Adityanath : ‘प्रक्षोभक भाषण’ प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा | पुढारी

Yogi Adityanath : ‘प्रक्षोभक भाषण’ प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांना दिलासा दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी 2007 साली प्रक्षोभक भाषण केल्याचा दावा करीत याचिकाकर्त्याने आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सदर प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. याचिकाकर्ता परवेज याच्याकडून फुजैल अयुबी तर उत्तर प्रदेश सरकारकडून अॅड. मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तसेच कारवाई करण्याचे निर्देश देण्यास नकार देण्यात आल्याने या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली असल्याचा आक्षेप अयुबी यांनी सुनावणीदरम्यान केला.

प्रक्षोभक भाषणप्रकरणी जो तपास करण्यात आला होता, त्यात त्रुटी आढळून येत नाहीत, असा शेरा मारत अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2018 साली योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांच्याविरोधातली याचिका निकाली होती. ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त भाषण केले होते, त्यावेळी ते गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांचे भाषण दोन गटात वैमनस्य वाढविणारे असल्याचे सांगत तेव्हा गोरखपूरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांच्या वादग्रस्त भाषणानंतर गोरखपूरमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना झाल्या होत्या, असा दावाही याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता.

Back to top button