बीड : बोरगाव शिवारातील सोयाबीन पिकाला ‘यलो मोजक डिसीज’चा विळखा | पुढारी

बीड : बोरगाव शिवारातील सोयाबीन पिकाला 'यलो मोजक डिसीज'चा विळखा

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील बोरगावमध्ये बहरात आलेला सोयाबीन पिवळे पडल्याने करपू लागला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबतचे वृत्त ‘दै. पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेत कृषी सहाय्यक बोरगावमध्ये आज (दि.१९) दाखल होऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. यावेळी पूर्ण पीक नष्ट करणारे यलो मोजक डिसीज असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

बोरगाव बु. येथील अनेक ठिकाणी अचानक बहरात असलेले शेतातील सोयाबीन हळूहळू पिवळे पडत असल्याचे अनेक शेतकऱ्यांना दिसून येऊ लागले. सतिश वळेकर या शेतकऱ्याचे २ एकरावरील सोयाबीन बघता बघता पिवळे पडून करपले. याची माहिती त्यांनी ‘दै. पुढारी’च्या प्रतिनिधीला दिल्यानंतर याबाबतचे वृत्त पुढारीतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर कृषी सहायक एस. एस. लोणकर बोरगावमध्ये दाखल झाल्या. त्यांनी शिवारातील बाधित क्षेत्राची पाहणी करून हे यलो मोजक डिसीज असल्याचे स्पष्ट करीत याला रोखण्यासाठी बाधित पीक बाहेर काढणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

हा व्हायरस असल्याने तो लागतच्या इतर झाडांनाही कवेत घेत असल्याने त्या क्षेत्रातील पीक संपुष्टात येते. त्यामुळे कमी बाधित क्षेत्रातील पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करावी. बाधित झाडे बाजूला करावीत. असे यावेळी त्यांनी सांगितले. २० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या व्हायरसने संकटात सापडले असून रोज यामध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीनवर पडलेला यलो मोजक डिसीजवर कुठलेच प्रभावी औषध नाही. त्यामुळे महागडी औषधांची फवारणी करूनही उपयोग होईल, याची शाश्वती नाही. सध्या या रोगाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button