Stuart Broad : स्टुअर्ट ब्रॉडचे लॉर्ड्सवर अनोखे ‘शतक’! अँडरसन-मुरलीधरनच्या यादीत सामील | पुढारी

Stuart Broad : स्टुअर्ट ब्रॉडचे लॉर्ड्सवर अनोखे ‘शतक’! अँडरसन-मुरलीधरनच्या यादीत सामील

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (stuart broad) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. सामन्याच्या दुस-या दिवशी ब्रॉडने क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर अनोखे शतक झळकावले. द. आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज काईल व्हर्नची विकेट घेत विकेट्चे एक खास शतक पूर्ण केले. या मैदानावर 100 कसोटी बळी घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम त्याचाच सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसनने केला आहे. यासह एका मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ब्रॉड जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे.

ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडची स्थिती फारशी चांगली नाही. प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाचा डाव अवघ्या 165 धावांवर आटोपला. ओली पोपने सर्वाधिक धावा करत अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 73 धावा केल्या. मात्र त्याच्या शिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने पाच बळी घेतले.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 7 गडी गमावून 289 धावा केल्या आणि भक्कम आघाडी घेतली. स्टुअर्ट ब्रॉडला (stuart broad) या सामन्यात आतापर्यंत एकच विकेट मिळाली आहे पण या एका विकेटसह त्याने मोठी कामगिरी केली आहे. आता तो लॉर्ड्सवर 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम त्याचाच सहकारी जेम्स अँडरसनने केला आहे.

अशी कामगिरी करणारा स्टुअर्ट ब्रॉड हा एकूण चौथा गोलंदाज

स्टुअर्ट ब्रॉडने (stuart broad) दक्षिण आफ्रिकेच्या काईल व्हेरिनला बाद करून ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर विकेट्च्या शतक पूर्ण केले. कोणत्याही एका मैदानावर 100 कसोटी बळी मिळवण्यात तो चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेराथ यांनीही हा पराक्रम केला आहे. मुरलीधरनने तीन मैदानात 100 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने गॅले, कॅंडी आणि कोलंबोच्या मैदानावर हा पराक्रम केला आहे. मुरलीधरन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 553 विकेट्स आहेत. आता त्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडणे हेच असेल. मॅकग्राने कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 658 विकेट्स मिळवल्या आहेत.

एकाच मैदानावर 100 कसोटी बळी घेणारे खेळाडू

मुथय्या मुरलीधरन – सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो – 166
मुथय्या मुरलीधरन – असगिरिया स्टेडियम, कॅंडी – 117
जेम्स अँडरसन – लॉर्ड्स, लंडन – 117*
मुथय्या मुरलीधरन – गॅले इंटरनॅशनल स्टेडियम, गले – 111
रंगना हेरथ – गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गले – 102
स्टुअर्ट ब्रॉड – लॉर्ड्स, लंडन – 100*

Back to top button