गांधी, नेहरू, पटेलांच्या नावाने खोटा इतिहास सांगितला जातोय : सोनिया गांधी यांचा आरोप | पुढारी

गांधी, नेहरू, पटेलांच्या नावाने खोटा इतिहास सांगितला जातोय : सोनिया गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : केंद्रातले मोदी सरकार आत्ममग्न असून महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचा खोटा इतिहास या सरकारकडून सांगितला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केला. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे.

खोटा इतिहास सांगून देशभरात संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र त्याला आम्ही तीव्र विरोध करू, असे सांगून सोनिया गांधी पुढे म्हणतात की, गत 75 वर्षात प्रतिभावंत भारतीयांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आपण विज्ञान, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक भारतीयांच्या कष्टामुळे हे साध्य झाले आहे. आपल्या दृष्ट्या नेत्यांमुळे आपण एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक व्यवस्था स्थापन केलेली आहे. तसेच लोकशाही आणि संवैधानिक संस्थांना मजबूत केले आहे. भाषा, धर्म, विविधता असूनही भारताने एक आघाडीचा देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे, असेही साेनिया गांधी यांनी म्‍हटले आहे.

गेल्या 75 वर्षात देशाने अनेक मोठी उद्दिष्टे गाठली आहेत. पण हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचे काम करीत आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक गोष्टींची मोडतोड केली जात आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही हे प्रयत्न मोडून काढू. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असेही सोनिया गांधी यांनी आपल्‍या संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button