

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी (दि.१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी पाच संकल्प (पंच प्रण) केले आहेत. विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेचा वंश राहणार नाही, वारशाचा अभिमान, देशवासीयांची एकता आणि एकजुटता, नागरिकांच्या कर्तव्याचे पालन असे हे पंचप्राण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पुढील २५ वर्षे देशासासाठी महत्वाची असतील, असेही त्यांनी नमूद केले. पुढील २५ वर्षांत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत हे पाच संकल्प पूर्ण करायला हवेत. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होत असताना हे पंचप्राण घेऊन स्वातंत्र्यप्रेमींची स्वप्ने पूर्ण करायची आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ध्वजारोहण केले. गुलामगिरीच्या छोट्या गोष्टीपासूनदेखील आपल्याला मुक्ती मिळावयाची आहे. देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरे आव्हान म्हणजे भाऊबंदकी, घराणेशाही. एकीकडे असे लोक आहेत ज्यांना राहायला जागा नाही आणि दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा माल ठेवायला जागा नाही. ही स्थिती चांगली नसल्याची खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा :