पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज ह्दयविकारामुळे निधन झाले. मागील काही दिवस ते मधुमेह आणि किडनीच्या विकाराशी लढत होते. त्यांच्या तब्बल ४६ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे वारसदार ( Rakesh Jhunjhunwala Family) आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घेवूया…
राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा, मुले आर्यमान आणि आर्यवीर असा परिवार आहे. त्यांच्या अकासा एअरलाईन कंपनीमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहे. दोघांचा एकूण वाटा 45.97 टक्के आहे. स्टार हेल्थ एलाईड इश्युरंसमध्येही त्या प्रमोटर आहेत. त्यामुळे आता राकेश झुनझुनवाला यांच्या हजारो कोटींचे साम्राज्य सांभाळण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पत्नीवरच असणार आहे. तसेच राकेश यांच्या निधनामुळे एअरलाईन कंपनी आणि अन्य उद्योगांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल, असेही मानले जात आहे.
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) असणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी 1985 मध्ये पाच हजार रुपये गुंतवून गुंतवणूकदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. एकेकाळी त्यांनी टाटा ग्रुपच्या टाटा टी कंपनीचे पाच हजार शेअर्स 43 रुपये दराने खरेदी केले.तीन महिन्यांत 'टाटा टी'च्या शेअर्सची किंमत वाढली. त्यानंतर 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी हा शेअर 143 रुपयांना विकला. या निर्णयामुळे झुनझुनवाला यांना तीन महिन्यांत 2.15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाख रुपयांचा नफा झाला हाेता.
पुढील तीन वर्षांत राकेश झुनझुनवाला शेअर्समध्ये पैसे गुंतवून कोट्यधीशांच्या यादीत आले. या तीन वर्षांत त्यांनी सुमारे कोट्यवधींचा नफा कमावला होता. यानंतर त्यांनी टाटा ग्रुपच्या दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले. यातून ते भारतीय शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखले जावू लागले.
2003 मध्ये त्यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये पैसे गुंतवले. त्यावेळी त्यांनी टायटनचे सहा कोटी शेअर्स तीन रुपये दराने खरेदी केले होते. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते, ज्यांचे मूल्य 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी सुमारे 50 मिलियन डॉलर्सच्या मोठ्या गुंतवणुकीसह त्यांची अकासा नावाची एअरलाइन सुरू केली आहे.
झुनझुनवाला हे शॉर्ट सेलमधील तज्ज्ञ मानले जात. एका मुलाखतीत झुनझुनवाला यांनी स्वत: सांगितले होते की, त्यांनी शेअर्स विकून खूप पैसा कमावला आहे. हर्षद मेहता घोटाळा समोर आल्यानंतर 1992 मध्ये शेअर बाजार कोसळला होता. झुनझुनवाला यांनी या काळात खूप शॉर्ट सेलिंग केली.
झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील सर्वाधिक पसंतीचा स्टॉक म्हणजे घड्याळ आणि दागिने बनवणारी कंपनी टायटन. हा टाटा समूहाचा भाग आहे. या कंपनीत गुंतवणूक करून त्यांनी भरपूर पैसा कमावला. 31 मार्च 2021 रोजी तिमाहीच्या समाप्तीपर्यंत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नजर टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्ससह 37 स्टॉक होते आहेत.
राकेश झुनझुनवाला यांनी २०१७ मध्ये मालाबार हिल येथील स्टँटर्ड चार्टर्ड बॅकेतील १२ युनिटपैकी ६ युनिट १७६ कोटी रुपयांना खरेदी केली होते. तसेच 'एचएसबीसी' बँकेकडून १९५ कोटी रुपयांना अन्य ६ अपार्टमेंटही खरेदी केल्या होत्या. २०२१ मध्ये त्यांनी ही संपूर्ण इमारत पाडून १३ मजली बंगला बांधण्याचे काम सुरु केले होते.
अकासा Airline लाँच करणे हा राकेश झुनझुनवालाचा ड्रीम प्रोजेक्ट होता. अकासा एअरची विमानसेवा सुरू झाल्याचा उल्लेख त्यांनी अनेक वेळा केला. नुकतेच 7 ऑगस्ट रोजी अकासाच्या पहिल्या विमाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पहिले उड्डाण केले. यानंतर बरोबर 7 दिवसांनी एअरलाइनचे सर्वात मोठे स्टेकहोल्डर म्हणजेच राकेश झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला.