बॉयफ्रेंडच्या सल्ल्याने उजळले ‘तिचे’ नशिब! | पुढारी

बॉयफ्रेंडच्या सल्ल्याने उजळले ‘तिचे’ नशिब!

वॉशिंग्टन : कुणाचे भाग्य कसे उघडेल हे काही सांगता येत नाही. जगभरात कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकलेल्या अनेकांनी लॉटरी तिकिट योगायोगानेच खरेदी केल्याचीही उदाहरणे आहेत. आता अमेरिकेतील एका मुलीला तिच्या बॉयफे्रंडने असा सल्ला दिला होता, जो ऐकल्यानंतर ती लखपती झाली. तिने तब्बल 50,000 डॉलर म्हणजेच जवळपास 41 लाख रुपये जिंकले आहेत.

अमेरिकेत मेरिलँड येथे राहणार्‍या या तरुणीचे नाव ब्रिन असे आहे. या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तिला हे करायचं नव्हतं. मात्र, मुलाने अनेकवेळा सांगितल्यामुळे तिने तिकीट विकत घेतले. मुलीने 10 डॉलर म्हणजे 834 रुपयांना तिकीट खरेदी केलं होतं. लकी ड्रॉबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिने मेरिलँड लॉटरी अ‍ॅपवर स्कॅन केलं. मेरिलँड लॉटरीच्या रिलीझनुसार, ब्रिन घरी आली आणि तिचे तिकीट स्क्रैच केलं.

मेरिलँड लॉटरी अ‍ॅपवर तिचं तिकीट अनेक वेळा तपासलं, तेव्हा तिला समजलं की, तिने बक्षीस म्हणून मोठी रक्कम जिंकली आहे. ती म्हणाली की, “मी किंचाळत होते. कारण, माझा विश्वास बसत नव्हता. मी इतक्या जोरात ओरडले की मला वाटलं माझ्या शेजार्‍यांना माझा आवाज ऐकू गेला. मला खूप आनंद झाला कारण जेव्हा तुम्ही जिंकण्याची अपेक्षा करत नाही आणि तसं काही घडतं. हे पैसे कसे खर्च करणार हे माहीत नाही.” असे ब्रिनने सांगितले.

Back to top button