Sushmita Sen : सुष्मिता १९ व्या वर्षी झाली होती मिस युनिव्हर्स | पुढारी

Sushmita Sen : सुष्मिता १९ व्या वर्षी झाली होती मिस युनिव्हर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी विवाह केल्याचे म्हटले जात आहे. सुष्मिताचे (Sushmita Sen) वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये. वयाच्या १८ व्या वर्षी मिस इंडिया आणि १९ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनलेली सुष्मिता तिच्या अफेअर्सच्या पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत आहे. दिग्दर्शक विक्रम भट्ट सुष्मिताच्या ‘दस्तक’ या डेब्यू चित्रपटाचे लेखक होते. या दोघांचे नाव खूप जोडले गेले आणि वर्षानुवर्षे चर्चेत राहिले. १९९६ मध्ये सुरू झालेली नात्याची ही मालिका २०२१ मध्ये रोहमन शॉलसोबत ब्रेकअप होईपर्यंत सुरू राहिली. (Sushmita Sen)

सुष्मिता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. लग्नाचा प्रश्न तिने नेहमीच टाळला, पण दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी उचलल्याबद्दलही तिचे खूप कौतुक झाले.

जाणून घ्या सुष्मिताच्या आयुष्यातील काही अनपेक्षित पैलू-

हैदराबादमधील बंगाली कुटुंबात जन्मलेले सुष्मिताचे वडील हवाई दलात होते. सुष्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर, १९७५ रोजी बंगाली वैद्य कुटुंबात झाला. हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुष्मिताचे वडील सुबीर सेन हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते आणि आई शुभ्रा सेन दागिने डिझायनर होत्या. तिचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबादमध्येच झाले. त्यानंतर एअरफोर्स गोल्ड ज्युबिली इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून तिने पदवी घेतली. याच काळात सुष्मिताने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला.

१९९४ च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या रायसोबत सुष्मिता सेन होती. याच स्पर्धेत ऐश्वर्याला हरवून सुष्मिताने मिस इंडियाचा किताब जिंकला होता.

ऐश्वर्या रायला हरवून मिस इंडिया बनली

१९९४ मध्‍ये ‘फेमिना मिस इंडिया’च्‍या स्‍पर्धेत सुष्मिता सेनने दिलेल्‍या एका उत्तरामुळे ऐश्‍वर्याला ‘मिस इंडिया’चं मुकूट मिळवता आलं नाही. ऐश्‍वर्या केवळ २ गुणांनी हारली होती.

फेमिना मिस इंडियामध्‍ये ९.३३ गुणांवर टाय

गोव्‍यात झालेल्‍या स्‍पर्धेत ऐश्‍वर्या आणि सुष्‍मिता सेनला एकसारखे गुण मिळाले होते. दोघींच्‍यात ९.३३ गुणांवर टाय झाला होता. जजेसने टाय ब्रेक करण्‍यासाठी दोघींना एक-एक प्रश्‍न विचारला होता. ज्‍यामध्‍ये ऐश्वर्याला विचारण्‍यात आलं होतं की, ‘जर तुला तुझ्‍या पतीमध्‍ये कोणते गुण आहेत, हे शोधायचं असेल तर तू काय करशील? समज, तुला द बोल्ड ॲण्‍ड ब्यूटीफुलचे रिज फॉरेस्टर आणि सांता बारबराच्‍या मेसन कॅपवेल यांच्‍यापैकी कुणाला निवडशील?’ ऐश्वर्याने उत्तर दिलं…’मेसन.’ ती म्‍हणाली, ‘कारण आमच्‍या दोघांत अनेक सारख्‍या गोष्‍टी आहेत. मेसनचा स्‍वभाव खूप केअरिंग आहे आणि त्‍यांचा सेन्‍स ऑफ ह्यूमर देखील चांगलं आहे.’

सुष्मिताने या प्रश्‍नाचं उत्तर देऊन जिंकलं मुकुट

सुष्मिता सेनला विचारण्‍यात आलं होतं की, ‘आपल्‍या देशातील टेक्सटाईल हेरिटेजबद्‍दल काय जाणतेस? हे किती जुनं आहे आणि तुला घालायला आवडेल?’ सुष्‍मिता म्‍हणाली, ‘मला वाटतं की, हे सर्व महात्मा गांधी यांच्‍या खादीपासून सुरू झालं होतं. तेव्‍हापासून याचा दीर्घकाळ प्रवास आहे. परंतु, टेक्स्टाईल हेरिटेजच्‍या मूळ गोष्‍टी तेथूनच आहेत.’

मिस इंडियाच्‍या फायनल राउंडमध्‍ये ऐश्वर्या-सुष्मिता या दोघींच्‍यामध्‍ये टक्कर पाहायला मिळाली होती. सुष्मिताला विचारण्‍यात आलं होतं की, ‘जर तू एखाद्‍या ऐतिहासिक घटनेला बदलू शकली असतीस तर ती कुठली गोष्‍ट असती?’ यावर सुष्मिताने म्‍हटलं होतं, ‘इंदिरा गांधी यांचा मृत्यू’.

या एका उत्तराने सुष्मिताचं भाग्‍य उजळलं आणि ती ‘मिस इंडिया’ बनली. टाय ब्रेकअपनंतर ‘मिस इंडिया’चा मुकूट सुष्‍मिता सेनला परिधान करण्‍यात आला. (१९९४) ऐश्‍वर्याला केवळ २ गुणांनी ही स्‍पर्धा जिंकता आली नव्‍हती.

काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की सुष्मिताला मिस इंडियाच्या त्या स्पर्धेत उतरायचे नव्हते, कारण तिथे ऐश्वर्याला प्रबळ स्पर्धक मानले जात होते. तरीही काही लोकांनी आग्रह धरला आणि सुष्मिता या स्पर्धेत उतरली.

१९९४ मध्ये जेव्हा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला, तेव्हा सुष्मिता सेन अवघ्या १९ वर्षांची होती. मिस युनिव्हर्स झाल्यावर सुष्मितासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले. तिला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. अनेक बड्या दिग्दर्शक-निर्मात्यांना तिला घेऊन चित्रपट करायचा होता. त्यानंतर सुष्मिताने महेश भट्ट यांचा चित्रपट साईन केला, जो त्या काळातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक होता. ‘दस्तक’ असे या चित्रपटाचे नाव होते. ही कथा होती एका ‘ब्युटी क्वीन’च्या वेड्या प्रियकराची. येथून सुष्मिताचा चित्रपट प्रवास सुरू झाला.

Back to top button