महाबळेश्‍वरात कोसळधारा | पुढारी

महाबळेश्‍वरात कोसळधारा

महाबळेश्वर;  पुढारी वृत्तसेवा :  महाबळेश्‍वरमध्ये गेले काही दिवस धुवाँधार पाऊस कोसळत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 11 इंच विक्रमी पावसाची नोंद येथे झाली. वेण्णा नदीही ओसंडून वाहू लागली असून बगीचा कॉर्नर परिसर जलमय झाला आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच राहिल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे.

गेली 15 दिवस येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धुवाँधार कोसळणारा पाऊस आता शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. मुसळधार पावसाने शहर व परिसराला अक्षरश: झोडपून काढले असून येथील अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जून महिन्यात केवळ दहा इंचाचाच टप्पा पार करणार्‍या पावसाने जुलै महिन्यात मात्र दमदार आगमन केले. गेले काही दिवस कोसळणार्‍या पावसाने महाबळेश्‍वरची जीवनवाहिनी असलेला प्रसिद्ध वेण्णा तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. येथील प्रसिध्द लिंगमळा धबधबाही ओसंडून वाहत असून येथील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

गेली 15 दिवस महाबळेश्‍वर शहर व तालुक्यात सर्वत्र पावसाची धुवाँधार बॅटींग सुरुच आहे. अवघ्या पंधरा दिवसात पावसाने शंभर इंचाचा टप्पा गाठला आहे. पावसाची संततधार गुरुवारीही कायम होती. या पावसामुळे वेण्णालेकनजीकचा बगीचा कॉर्नर परिसर जलमय झाला. मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे व संजय भोसले यांनी वाहनचालकांना मार्ग दाखवीत वाहतूक सुरळीत सुरु ठेवली.

जोरदार पावसामुळे वेण्णा नदीही ओसंडून वाहत असल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला होता. तालुक्यातील ओढे, नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शहरात काही ठिकाणी सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसत होते. तालुक्यातील अनेक भागांमध्ये भात लावणीचे काम जोमात सुरु असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

बुधवार सकाळी 8.30 ते गुरुवार सकाळी 8.30 या 24 तासांमध्ये तब्बल 294.2 मिमी 11.58 इंच पावसाची नोंद झाली. या हंगामातील ही विक्रमी नोंद होती. 01 जून ते 14 जुलै सकाळी 8.30 वाजेपर्यंत 2325.4 मिमी (91.55 इंच) पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी (सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत … मिमी ( इंच) पावसाची नोंद झाली.

Back to top button