सातारा : स्थूलतेच्या विळख्यात अडकतेय बालपण | पुढारी

सातारा : स्थूलतेच्या विळख्यात अडकतेय बालपण

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  सर्वसाधारणपणे गुटगुटीत व बाळसेदार मुले हा कौतुकाचा विषय असतो. मात्र, अलीकडच्या काळात हा बाळसेदारपणाच चिंतेची बाब बनला आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा अतिरेक यामुळे वाढत्या वयानुसार वजन वाढतच जात असल्याने अनेक आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असून अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अनेक बालकांना लठ्ठपणाचा विकार जडत असल्याने अतिरिक्त वजनाकडे वेळीच लक्ष देवून नियंत्रण मिळवण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

बाळ जन्मलं की ते सुदृढ बालक असावे यासाठी त्याच्या आईसह संपूर्ण कुटुंब कंबर कसत असते. कारण गुटगुटीत व बाळसेदार मूल हा कौतुकाचा भाग असतो. परंतु हेच बाळसे जेव्हा मूल मोठे होईल तसे कमी न झाल्यास पालकांमध्ये काळजी वाढत आहे. मुलांची बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा अतिरेक यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. त्यातच सध्याच्या काळात सायंकाळच्यावेळी मित्र-मैत्रिणी, भावंडांसोबत खेळण्याचे वेळापत्रकच दिनचर्येतून गायब झाले आहे.

विभक्‍त कुटुंबपध्दतीमुळे मुलांना हवे त्या अत्याधुनिक सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. स्वत:ची कामे स्वत: करण्यासाठी होणारा शारीरिक व्यायाम कमी झाला आहे. मागील काही वर्षांपासून मुलांचा लठ्ठपणा म्हणजेच पिडीयाट्रिक ओबेसिटी हा विकार लहान मुलांमध्ये जडत आहे. त्यामुळे स्थूलता हा मुलांचे पालक व वैद्यकीय तज्ञ यांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. आहारामध्ये जंकफूडचा समावेश, गोड व तेलकट पदार्थांचा अतिरेक, शारीरिक हालचालींचा अभाव, कोरोना काळात घरात बंद राहावे लागणे यामुळे मुलांना शालेय जीवनातच वजन वाढीचा त्रास होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण घरातूनच सुरु होते. शाळा बंद असल्याने मित्र-मैत्रिणींसोबत खेळ व मैदानापासून मुले दुरावली होती. ऑनलाईन शिक्षणामुळे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल हातात आल्याने मुले गॅझेटमध्ये गुरफटली होती. त्यामुळे अनेक लहान मुलांचे वजन वाढले आहे. अशा मुलांमध्ये वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवत आहेत.

हल्‍ली लहान मुलांमध्ये मधुमेहाचा आजार बळावत आहे. त्यांना उच्च रक्‍तदाब, धाप लागणे, अतिरिक्‍त वजनामुळे हाडे व मणक्यांचे विकार जडत आहेत. बालरोगतज्ञाच्या निरीक्षणानुसार तपासणीसाठी येणार्‍या 100 मुलांपैकी दहा मुलांची वाटचाल स्थूलतेच्या दिशेने असल्याचे वास्तव आहे. तसेच चयापचयाचे विकारही मुलांमध्ये बळावत आहेत. आजची बालके ही उद्याचे सुजान नागरिक व देशाचे भविष्य आहेत. ते निरोगी राहण्यासाठी योग्य आहार व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांमधून व्यक्‍त
होत आहे.

ग्रोथ चार्ट अंमलबजावणीची गरज…
लहान मुलांची वाढ योग्यरितीने होते का नाही याचा अंदाज घेण्यासाठी बालकांच्या ग्रोथ चार्टमध्ये नोंदी ठेवणे गरजचे आहे. मुलांच्या वजनातील वाढ योग्य आहे की चुकीच्या दिशेने होत आहे, याचा अंदाज वेळीच पालकांना मिळू शकतोे. त्यामुळे मूल स्थूलतेकडे वळण्यापूर्वीच आहार व अनावश्यक वजनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. त्याचबरोबर जीभेचे चोचले पुरवण्यापेक्षा आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

जीवनशैलीजन्य आजारांच्या धोक्याचे वय अलीकडे आले आहे. मुलांच्या आहाराचे नियोजन आवश्यक असून त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, प्रथिने व डाळी व मांसाहाराचे योग्य प्रमाण असावे. मैद्याचे व गोड पदार्थ खाणे टाळावे. दिनक्रमात शारीरिक व्यायाम होणार्‍या खेळांचा समावेश करुन व्यायामाचे महत्त्व मुलांना पटवून द्यावे.
– डॉ. विजया कदम, आहार व योगतज्ज्ञ, सातारा

Back to top button