जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती | पुढारी

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यातर्गंतच्या २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात येणार होता. परंतु मंगळवारी (दि.१२) झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलैरोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यातर्गंतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम लवकरच देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button