पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलैला होत असून 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. एनडीएकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी यांना पाठिंबा द्यायचा का नाही यावर अनेक दिवसांपासून चर्चा, तर्कवितर्क सुरू आहे. या सर्वांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे.
उद्धव यांनी कोणाच्याही दबावात न येता देशातील आदिवासी समाजाच्या महिलेला पहिल्यांदाच संधी मिळत असल्याने आपण पाठिंबा देत असल्याचे उद्धव म्हणाले. राज्यातील अनेक आदिवासी एससी-एसएसटी समाजाच्या बांधवांनी आपल्याला विनंती केली होती. सर्वांच्या आग्रहाखातीर आपण पाठिंबा देत आहोत.
शिवसेना खासदारांची काल बैठक झाली होती. यावेळी सर्व खासदारांनी देखील मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती केली होती. त्यांच्याही विनंतीचा आणि देशाचा विचार करत हा निर्णय घेतला असून आपल्यावर कोणीही दबाव आणलेला नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.