‘IPL मध्ये विश्रांती का घेतली नाही?’, सुनिल गावस्कर सीनियर खेळाडूंवर भडकले | पुढारी

‘IPL मध्ये विश्रांती का घेतली नाही?’, सुनिल गावस्कर सीनियर खेळाडूंवर भडकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandeya) या सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आता याच कारणावरून वादाला तोंड फुटले आहे. माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी तर या ज्येष्ठ खेळाडूंवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्याचे दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय मालिकांमधून विश्रांती घेतात, पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) विश्रांती न घेता खेळतात, हे मला मान्य नाही, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

गावस्कर म्हणाले, ‘खेळाडूंना विश्रांती देण्याच्या कल्पनेशी मी सहमत नाही. अजिबात नाही. जर तुम्ही आयपीएलमध्ये विश्रांती घेत नसाल तर भारताकडून खेळताना अशी मागणी का करता? हे मला मान्य नाही. तुम्हाला भारतासाठी खेळावे लागेल. विश्रांतीबद्दल बोलू नका, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘T20 मध्ये एका डावात फक्त 20 षटके असतात. त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही. कसोटी सामन्यात मन आणि शरीरावर परिणाम होतो, हे मी समजू शकतो. पण टी 20 (T20) मध्ये काही अडचण आहे असे मला वाटत नाही, असेही मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

‘मला वाटते की बीसीसीआयने विश्रांतीच्या या कल्पनेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ए ग्रेडच्या सर्व क्रिकेटपटूंना खूप चांगले करार मिळाले आहेत. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी पैसे मिळतात. मला सांगा, अशी कोणती कंपनी आहे का जी आपल्या सीईओ किंवा व्यवस्थापकीय संचालकांना इतकी सुट्टी देते?, असे म्हणत सुनील गावस्कर यांनी सिनिअर खेळाडूंना टोला लगावला आहे.

धवन संघाचा कर्णधार

वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.

Back to top button