INDvsENG ODI : इंग्लंड 110 धावांत ऑलआऊट, बुमराहचा बळींचा ‘षटकार’ | पुढारी

INDvsENG ODI : इंग्लंड 110 धावांत ऑलआऊट, बुमराहचा बळींचा ‘षटकार’

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 110 धावांत ऑलआऊट झाला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 5 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बुमराहने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. भारताने 10 षटकांत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 2004 नंतर पहिल्यांदाच असा पराक्रम केला आहे. याआधी यूएई विरुद्ध डम्बुला येथे भारताने 10 षटकात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Image

भारताविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या इंग्लंडला एकामागोमाग एक झटके बसले आहेत. जसप्रीत बुमराहने इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले. आपल्या पहिल्याच षटकात त्याने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जसप्रीतने प्रथम जेसन रॉयला बोल्ड केले. त्यानंतर क्रमांक-3वर फलंदाजीला आलेल्या रूटची शिकार केली. त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. दोघेही बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स मैदानात आला, मात्र मोहम्मद शमीने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टोक्स शुन्यवर बाद झाला.

तीन खेळाडू बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा डाव सांभाळेल असे वाटत होते. त्याने 20 चेंडूही खेळले, पण बुमराहच्या भेदक मा-या समोर त्यचा टीकाव लागला नाही आणि तो पंतच्या हाती झेलबाद झाला. बेअरस्टो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.26 धावसंख्येवर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाचवा धक्का देत लियाम लिव्हिंगस्टोनला क्लीन बोल्ड केले. बुमराहची ही चौथी विकेट ठरली. आतापर्यंत 20 षटकांत बुमराहने 6 धावा देत चार बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. लिव्हिन्स्टोन बाद झाल्यानंतर मोईन अलीने कर्णधार बटलरसोबत 27 धावांची भागीदारी केली, परंतु 14 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याने प्रसिद्ध कृष्णाला आपली विकेट दिली. इंग्लंडला 53 धावांवर सहावा धक्का बसला. तर 15 व्या षटकात मोहम्मद शमीने मोठा झटका देत जोस बटलरला माघारी धाडले. इंग्लंडची 7 वी विकेट 59 धावांवर पडली. बटलरने 30 धावा केल्या. इंग्लंडचा अवघ्या काही वेळातच ऑलआऊट होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 17 व्या षटकात मोहम्मद शमीने क्रिक ओव्हर्टनला बाद करून भारताला 8 वे यश मिळवून दिले. तो 8 धावा करून बाद झाला. इंग्लंडने 22 व्या षटकात 100 धावा पूर्ण केल्या. 24 व्या षटकात बुमराहने कार्सला 15 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. बुमराहची ही 5 वी विकेट आहे.

इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 4 पैकी तीन खेळाडू शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रॉय, बेअरस्टो आणि रूट हे शुन्यावर बाद झाले होते. तर आज 12 जुलै 2022 ला भारताविरुद्ध खेळताना रॉय, रूट आणि स्टोक्स हे खते न उघडताच माघारी परतले आहेत.

Image

तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने टॉसदरम्यान सांगितले की, विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या वनडेतून बाहेर आहे. मात्र, त्याने कोहलीला कसली दुखापत झाली आहे हे स्पष्ट केले नाही. कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. दुसरीकडे जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे.

Image

 

भारत प्लेइंग 11 :

रोहित शर्मा (c), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंड प्लेइंग 11 :

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली

आत्मविश्वासपूर्ण भारत…

आक्रमक खेळाच्या जोरावर टी 20 मालिका जिंकल्यानंतर भारताला वनडे मालिकेतही हीच गती कायम ठेवायची आहे. टी-20 नंतर वनडे मालिकेतही ब्ल्यू आर्मी आपले वर्चस्व दाखवू शकतील, असा विश्वास कर्णधार रोहितने व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, खेळाडू जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. टी-20 मालिका विजय आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. वनडे मालिकेत आम्ही टी-20 मालिकेपेक्षा साहसी खेळ करू,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

रोहित वरिष्ठ फलंदाज शिखर धवनसह डावाची सुरुवात करेल. पण केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या धवनसाठी पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा प्रतिकार करणे हे आव्हान असेल भारतीय फलंदाजीची फळी मजबूत दिसत असली तरी कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र दुखापतीमुळे त्याचे या सामन्यात खेळणे शंकास्पद आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला संधी मिळेल. सूर्यकुमार यादवचा सुपर फॉर्म भारतासाठी मोठा सकारात्मक आहे. तिसर्‍या टी-20 मध्ये त्याने बिकट परिस्थितीत शानदार खेळी करून शतकाला गवसणी घातली. या मालिकेतही त्याने चमक दाखवावी अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या चेंडू आणि बॅटने फॉर्मात आहे ही टीम इंडियासाठीही आनंदाची बाब आहे. बुमराह आणि शमीसह भारताचा वेगवान विभाग मजबूत दिसत आहे. त्यांचा सामना करणे इंग्लिश फलंदाजांसमोर आव्हान असेल. शार्दुल किंवा कृष्ण त्यांना चांगली साथ देतील. फिरकीचा भार चहल आणि जडेजा यांच्या खांद्यावर आहे. चहल फॉर्मात आहे पण जडेजाला चेंडूसह पुनरागमन करावे लागेल.

संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कर्णधार म्हणून बटलरची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. टी-20 मालिकेतील निकालामुळे निराश झालेल्या इंग्लंडने या मालिकेसह जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार केला आहे. टी 20 मालिकेत अपयशी ठरलेल्या बटलरला संघासाठी ट्रॅकवर परत येण्यासाठी आणि मोठी धावसंख्या उभारणे खूप महत्त्वाचे आहे. स्टोक्स, रूट आणि बेअरस्टो या स्टार खेळाडूंच्या जोडीने इंग्लंडची ताकद वाढली. स्टोक्स आणि बेअरस्टो यांना टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. मोईन अली आणि लिव्हिंगस्टोनकडून इंग्लंडला अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा आहे. यजमान टीम सर्व विभागांमध्ये चांगली दिसते.

Back to top button