औरंगाबाद : मुख्य न्यायमूर्तींच्या नावे सहप्रबंधकांशी चॅटिंग | पुढारी

औरंगाबाद : मुख्य न्यायमूर्तींच्या नावे सहप्रबंधकांशी चॅटिंग

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता असल्याचे भासवून अज्ञाताने औरंगाबाद खंडपीठातील सहप्रबंधक (प्रशासन) सुदेश श्रीनिवास कानडे यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर इंग्रजीमध्ये चॅटिंग केली. 25 जूनला दुपारी 1.49 वाजता ते हायकोर्टात ड्यूटीवर असताना हा प्रकार घडला.

या प्रकरणी त्यांनी लेखी अहवाल देऊन कळविल्याने प्रबंधक (प्रशासन) आनंद यावलकर (47, रा. शासकीय निवासस्थान, स्नेहनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रबंधक यावलकर यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, 25 जूनला सुदेश कानडे (57) हे औरंगाबाद हायकोर्टात ड्यूटीवर हजर होते. तेव्हा 1.49 वाजता त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून इंग्रजीत मेसेज आला. त्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा फोटो व नाव असलेला मोबाइलधारक असल्याने मुख्य न्यायमूर्तींनीच संदेश पाठविला, असे वाटले. त्यावर कानडे यांनी रिप्लाय दिला.

अखेर, तिकडून मेसेज बंद झाल्यावर कानडे यांनी मेसेज थांबविले, परंतु त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली. तेव्हा सदरचा मोबाइल क्रमांक हा मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोणीतरी आपल्याला त्यांच्या नावाने फसविण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रबंधकांना लेखी रिपोर्ट सादर केला. त्यांना हा गुन्ह्याचा प्रकार वाटल्याने या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.

Back to top button