दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन : जिल्हास्तरीय शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेस २० जूनपर्यंत मुदतवाढ | पुढारी

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन : जिल्हास्तरीय शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेस २० जूनपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन, बि—लियंट स्कूल्स, नरंदे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाळांच्या वाढत्या प्रतिसादास्तव स्पर्धेच्या नोंदणीस 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्पर्धा मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी स्वतंत्र असून, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक शाळेतून गटनिहाय दोन विद्यार्थ्यांचा एक संघ स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. स्पर्धेचा पहिला टप्पा तालुकास्तरावर होणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एक विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांसह कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर याठिकाणी प्राथमिक फेरी घेण्यात येईल.

राजर्षी शाहू महाराज व विज्ञान, गणित, भूगोल, चालू घडामोडी हे स्पर्धेचे फेरीनिहाय विषय आहेत. अंतिम फेरीतील सहभागी संघ व जिल्हास्तरीय विजेता व उपविजेता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी संघांतील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागासाठी शाळांनी 20 जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी 9604565699 या क्रमांकावर व ई-मेल pudhariyouthconnect@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button