पश्चिम बंगाल : ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मतदानावर होणार परिणाम | पुढारी

पश्चिम बंगाल : 'रेमल' चक्रीवादळामुळे मतदानावर होणार परिणाम

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘रेमल’ नावाचे भयंकर चक्रीवादळ रविवारी (दि.२६) बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली आहे. या चक्रीवादळामुळे पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान या चक्रीवादळात ताशी ८० ते १०० किलोमीटर क्षमतेने वारे वाहणार आहेत. पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघात शनिवारी (दि.25) होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे देखील वेधशाळेने म्हटले आहे.

वातावरण बदलामुळे चक्रीवादळांची संख्या वाढली

वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे समुद्राचे तापमान वाढत असल्याने चक्रीवादळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. १८८० पासून समुद्राच्या तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. गेल्या ३० वर्षांपासून समुद्राचे तापमान सातत्याने वाढू लागले आहे. भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै म्हणाले की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्याने हवेत आर्द्रतेचे वाढत आहे. या परिस्थितीमुळे चक्रीवादळ निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

चक्रीवादळाचा वेग १०२ किमी प्रतितास

भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ मोनिका शर्मा म्हणाल्या की, शुक्रवार सकाळपासून या चक्रीवादळावर लक्ष ठेवायला सुरुवात असेल, शनिवारी सकाळपासून या वादळाची तीव्रता वाढणार असून रविवारी सायंकाळी ते चक्रीवादळ बांगलादेश व प. बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. रविवारी या चक्रीवादळाचा वेग १०२ किमी प्रतितास होणार आहे. या वादळामुळे प. बंगाल, उत्तर ओदिशा, मिझोराम, त्रिपुरा व दक्षिण मणिपूर येथे २६ व २७ मे रोजी मुसळधार पाऊस होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : 

Back to top button