PM CARES for Children Scheme : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दर महिन्याला ४ हजार रुपये, ५ लाखांपर्यंत मोफत उपचार | पुढारी

PM CARES for Children Scheme : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दर महिन्याला ४ हजार रुपये, ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची (PM CARES for Children Scheme) सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेची कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात पीएम केअर्स फंडातून मदतनिधी पाठविला.

कोरोनामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. सरकार अनाथ मुलांच्या सोबत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, कोरोना संकटात ज्यांनी पालक गमावले, त्यांच्या जीवनात झालेला बदल अत्यंत कठीण आणि वेदनादायी आहे. जी व्यक्ती निघून जाते, त्याच्या केवळ आठवणी आपल्याजवळ राहतात. पण व्यक्ती निघून गेल्यानंतर आव्हानांचा डोंगर उभा राहतो. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन्स’ हा कोरोना प्रभावित मुलांच्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय अशा मुलांच्या पाठीशी संवेदनशीलरित्या उभा आहे. प्रभावित मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांच्या घराजवळच सरकारी अथवा खासगी शाळांत प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. जर एखाद्या मुलाला व्यावसायिक कोर्स किंवा उच्च शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठीही पीएम केअर्स फंड मदत करेल.

दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी सदर मुलांना अन्य योजनांच्या माध्यमातून महिन्याला ४ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, या मुलांची शाळा पूर्ण झाल्या त्यांना भविष्यासाठी देखील पैसा लागेल. याकरिता १८ ते २३ वयोगटातील युवकांना दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळेल तर मुले २३ वर्षाची झाल्यानंतर त्यांना एकत्रितपणे दहा लाख रुपयांची रक्कम मिळेल. एखादा मुलगा जर आजारी पडला तर त्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. अशा मुलांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेच्या (PM CARES for Children Scheme) माध्यमातून आयुष्मान हेल्थ कार्ड दिले जात आहे. यात ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मोफत राहणार आहे.

Back to top button