पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश 2030 पर्यंत ड्रोन हब

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश 2030 पर्यंत ड्रोन हब
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : 2014 पूर्वी प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासिनता होती. याचा सर्वाधिक तोटा गरीब, वंचित, मध्यवर्गियांना झाला. मात्र आता हेच तंत्रज्ञान गरिबांना त्यांचा हक्क मिळवून देत आहे. भारत 2030 पर्यंत ड्रोन हब होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दिल्लीतील प्रगती मैदानात शुक्रवारी 'भारत ड्रोन महोत्सव-2022' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, आधीच्या सरकारांना तंत्रज्ञान म्हणजे समस्या वाटत होती. त्यामुळे तंत्रज्ञान गरिबांच्या विरोधात असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न झाले. मी केदारनाथ विकास प्रकल्पावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले आहे. आता हेच तंत्रज्ञान लाखो शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरेल. आम्ही खुप कमी वेळात ड्रोनवरील निर्बंध हटवले आहेत.

ड्रोन प्रदर्शन आणि उद्योजकांची ध्येयासक्‍ती तसेच या क्षेत्रातील नवोन्मेषता पाहून खूप प्रभावित झाल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ड्रोन क्षेत्रातील ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे, त्यातूनच भारताची ताकद आणि आघाडीच्या स्थानावर झेप घेण्याची इच्छा दिसत आहे. रोजगार निर्मितीसाठी हे क्षेत्र मोठ्या संधी उपलब्ध करत आहे. जमिनीच्या नोंदीपासून ते पूर आणि दुष्काळ निवारणापर्यंतच्या कामांबाबत महसूल विभागावर सतत अवलंबून राहावे लागते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ड्रोन हे प्रभावी साधन म्हणून उदयाला आले आहे. कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे, तंत्रज्ञान यापुढे शेतकर्‍यांसाठी भीतीदायक राहणार नाही हे सुनिश्‍चित झाले आहे.

मोदींनी किसान ड्रोन चालकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. खुली ड्रोन प्रात्यक्षिके पाहिली आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रातील स्टार्टअप्सशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, अश्‍विनी वैष्णव, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव, अनेक राज्यमंत्री आणि ड्रोन उद्योगातील प्रमुख तसेच उद्योजक उपस्थित होते.

ड्रोन इंडस्ट्रीतून 5 लाख रोजगार

नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, भारतात ड्रोनचे युग आता आले आहे. एक ड्रोन सुरक्षिततेसाठी उपयोगी पडू शकते, शेतकर्‍यांनाही फायदेशीर ठरू शकते. 2026 पर्यंत ड्रोन इंडस्ट्रीची उलाढाल 15 हजार कोटींवर जाईल. आज देशात 270 ड्रोन स्टार्टअप आहेत. आगामी 5 वर्षात या उद्योगात 5 लाख रोजगार निर्माण होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news