Nashik : विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई, जिल्ह्यात ‘इतके’ टँकर | पुढारी

Nashik : विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई, जिल्ह्यात 'इतके' टँकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्यातील अखेरच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये 117 गावे आणि 199 वाड्यांना 102 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईच्या झळा नाशिकला जाणवत असून, जिल्ह्यात 81 गावे आणि 117 वाड्यांसाठी 71 टँकर सुरू आहेत. तर धुळे, नंदुरबार व जळगावला टँकरची संख्या मर्यादित आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात विभागात 70 टँकर सुरू होते. Nashik

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचण्यासाठी त्याला 7 जून उजाडणार आहे. तोपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामोरे जावे लागणार आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील टँकरच्या आकड्यांवर नजर टाकली असता नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 71 टँकर धावताहेत. त्या खालोखाल नगरमध्ये 27 गावे आणि 78 वाड्यांसाठी 22 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय. Nashik

नाशिक व नगरच्या तुलनेत अन्य जिल्ह्यांमध्ये टंचाई नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळते आहे. जळगावमध्ये 15 गावे-वाड्यांसाठी 7 टँकर सुरू आहेत. त्याचवेळी अवर्षणग्रस्त अशी ओळख लाभलेल्या धुळे व नंदुरबारमध्ये प्रत्येकी 1 टँकर धावत आहे. 2021 च्या उन्हाळ्यात नाशिक जिल्ह्यात 52 व नगरमध्ये 18 असे एकूण 70 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अन्य जिल्ह्यांमध्ये एकही टँकर सुरू नव्हता. दरम्यान, हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असून, आठवड्याभरात तो राज्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लवकर ग्रामीण जनतेला टँकरमधून सुटका मिळेल.

नाशिकमध्ये 31 टक्के पाणीसाठा जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये 20 हजार 179 दलघफू पाणीसाठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण 31 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच काळात 28 टक्के म्हणजेच 18317 दलघफू एवढा साठा होता. गंगापूर धरणात 1871 दलघफू (33 टक्के), तर समूहात 3022 दलघफू (30 टक्के) पाणी आहे. हे सर्व पाणी आता पिण्यासाठी राखीव असून, ते पुढील दीड महिना पुरेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

येवल्यात सर्वाधिक झळा
जिल्ह्यात येवल्याला सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत आहेत. तालुक्यातील 51 गावे-वाड्यांना 19 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याव्यतिरिक्त सिन्नरमध्ये 11, बागलाणला 10, पेठमध्ये 7, सुरगाणा व मालेगावी प्रत्येकी 6, चांदवडला 5, इगतपुरीत 3 तसेच त्र्यंबकेश्वर व देवळ्यात प्रत्येकी दोन टँकर धावत आहेत.

हेही वाचा :

Back to top button