Unique wedding : 36 इंच उंचीचा नवरा, 31 इंचाची नवरी विवाहबद्ध

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मुलाची उंची कमी असल्याने त्याचा विवाह कसा जुळेल? या विचाराने कुटुंबीय चिंतेत होते. परंतु, म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात याचा प्रत्यय जळगावात झालेल्या विवाहसोहळ्यात आला. 36 इंच उंची असलेला संदीप सपकाळे आणि 31 इंच उंची असलेली उज्ज्वला यांचा विवाहसोहळा (Unique wedding) मोठ्या थाटात पार पडला. या विवाहाची जळगाव शहरात चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.
शहरातील कांचननगर चौगुले प्लॉट परिसरातील रहिवासी संजय सपकाळे यांना चार अपत्ये आहेत. यातील संदीप सपकाळे यांची उंची केवळ तीन फूटच वाढल्याने सपकाळे परिवारावर त्यांच्या लग्नाची चांगलीच चिंता लागली होती. कारण एवढ्या कमी उंचीच्या तरुणाला मुलगी देणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. संदीपचे विवाहाचे वय वाढत असताना त्याच्या उंचीची मुलगी मिळत नसल्याने संदीपचा विवाह होईल किंवा नाही, अशी चिंता कुटुंबाला लागली होती. संदीपचे आई-वडील एका लग्न समारंभात गेले असता त्यांना संदीपसारखीच कमी उंचीची मुलगी त्यांना बघायला मिळाली. (Unique wedding )
अशी जुळली रेशीमगाठ
मुलीकडेही तिची उंची केवळ 31 इंच आल्याने अडचण निर्माण झाली होती. मुलगी पाहताच संदीपच्या आई-वडिलांनी मुलीकडच्यांची चौकशी करत संदीपसाठी तिला मागणी घातली. मूळची धुळ्याची उज्ज्वलासाठीही वर संशोधन सुरू होतं. मात्र, अनुरूप मुलगा मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. पण संदीप सपकाळे याच्या परिवाराने थेट लग्नासाठी मागणीच घातल्याने उज्ज्वलाच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण निर्माण झालं. हा विवाहसोहळा पाहण्यासाठी आणि या जोडप्यासह सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. आमच्या मनासारखी मुलगी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला असल्याचं संदीपची आई अलका सपकाळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Nepal Tara Air plane crash | २२ प्रवाशांसह कोसळलेल्या नेपाळच्या विमानाचे अवशेष सापडले, फोटो आला समोर
- सांगली : विधवा, घटस्फोटितांशी लग्न करण्यास तयार
- सिटी सेंटर परिसरात असणार प्रशस्त महापालिका भवन; आयुक्त राजेश पाटील यांची माहिती