दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव : 'इरगाल'ला बेस्ट फिल्म ज्युरी ॲवाॅर्ड | पुढारी

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव : 'इरगाल'ला बेस्ट फिल्म ज्युरी ॲवाॅर्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिल्लीत झालेल्या १२ व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘इरगाल’ चित्रपटाने बेस्ट फिल्म ज्युरी ॲवाॅर्ड पटकावला आहे. हा चित्रपट रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित आहे. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल” चित्रपटाला हा पुरस्कार मिळालाय. महाराष्ट्रातील मरिआई या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे.  लवकरच ताे चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अग्निपंख प्रोडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी यांनी इरगाल चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायांकन केशव गोरखे, संगीत दिग्दर्शन डॉक्टर जय-भीम सूर्यभान शिंदे, संकलन प्रशांत नाईक यांनी केलं आहे. राम पवार, राहुल चवरे, रशीद उस्मान निंबाळकर, सृष्टी जाधव, उषा निंबाळकर, दामोदर पवार, महादेवी निंबाळकर, स्वप्नाली बोडरे, स्वप्नाली तूपसुंदर, आप्पासाहेब खांडेकर, मस्के सर, अभिनंदन गवळी, साहेबराव जाधव, भारत निंबाळकर, शरणाप्पा बंडगर, शैला गायकवाड आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मरिआई ही दुर्लक्षित जमात आहे. डोक्यावर मरिआईचा गाडा, गळ्यात ढोलकं आणि चाबूक घेऊन हा समाज ऋतूप्रमाणे वर्षातील आठ महिने पोटासाठी भटकंती करत असतो. भटकंती दरम्यान कुठे ही मुले जन्माला येतात, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. मात्र अज्ञान व शिक्षणाच्या अभावामुळे मरीआई जमातीच्या जन्म-मृत्यूची नोंद शासनदप्तरी होत नाही. आज समाज जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, रेशन कार्ड आधार कार्ड साठी झगडताना दिसतो. मरिआई हा समाज अंधश्रद्धेच्या जोखडात बांधला गेला‌. समाजातील बोटावर मोजण्याइतपत तरुण मुलं शिक्षणाकडे वळल्यामुळे त्यांच्यात थोडीफार जागृती झाली आहे. मात्र शिक्षणामुळे या समाजाचा अंधकारमय जीवनात प्रकाश किरण येऊ शकते असा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रशीद निंबाळकर स्वतः मरिआई समाजाचा एक घटक आहेत. रशीद निंबाळकर यांनी वायसीएम मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड व्हिडीओ टेक्नॉलॉजी पुणे येथे प्रवेश घेतला. त्यांच्या “डुमरू” लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, दिल्ली येथे विशेष उल्लेख पुरस्कारासाठी निवडण्यात आलं होतं.

अंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरामुळे अनेक जाती जमाती विकासापासून कोसो मैल दूर आहेत. मरिआई हा त्यापैकी एक समाज आहे. मरिआई समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “इरगाल” हा चित्रपट केल्याचं रशीद निंबाळकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : 

Back to top button