नाशिक : पारंपरिक नृत्यांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन | पुढारी

नाशिक : पारंपरिक नृत्यांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरी भागातून आदिवासी संस्कृती, रुढी, परंपरा, कला लुप्त होत चालली आहे. राज्यातील आदिवासी रुढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार व प्रसिद्धीच्या उद्देशाने ईदगाह मैदानावर आदिवासी आदर्श संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा घेण्यात येत असून, त्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडत आहे.

सलग दोन दिवस नृत्य स्पर्धा रंगत असून, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून उत्कृष्ट आदिवासी पारंपरिक नृत्यपथके दाखल झाली आहेत. या पथकांनी सादर केलेल्या ढोल नृत्य, तंबोरी नृत्य, तारपा नृत्य आदींनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. पथकातील कलाकारांनी गोल फेर धरून संथ किंवा जलद गतीने नृत्य करीत स्पर्धेत उत्साह निर्माण केला. आदिवासींच्या पारंपरिक वाद्यांवर कलाकरांसह प्रेक्षकांनी ठेका धरल्याचे दिसून आले आहे. ‘टीआरटीआय’कडून सर्व सहभागी नृत्यकलाकारांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रवास खर्च, वाहतूक भत्ता, मानधन व दैनिक भत्ता दिला जाणार आहे. महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी या स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन नृत्यपथकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातुकाम, मातीकाम, वनौषधी व लाकडी लगद्याचे मुखवटे हे महोत्सवाचे आकर्षण ठरत आहेत.

आजपासून लघुपट महोत्सव – आदिवासी संस्कृतीची ओळख शहरी भागातील नागरिकांना होणे सहज शक्य नसते. त्या पार्श्वभूमीवर ‘टीआरटीआय’ने महाराष्ट्रातील आदिवासी कला, संस्कृती, जीवनमान तसेच शासकीय योजनांवर आधारित विविध विषयांच्या 93 लघुपटांची निर्मिती केली आहे. हे लघुपट सोमवारी (दि. 30) व मंगळवारी (दि. 31) सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button